सर्व देवी देवतांची निर्मिती ईश्वराने विशिष्ट हेतूनं केलेली आहे
अध्याय नववा
सृष्टीत जी काही बलवत्ता, विशेषता, विलक्षणता, शक्ती आणि तेज दिसून येते ते सर्व ईश्वरापासूनच आलेले आहे. बाप्पा म्हणाले, माझ्यात सुप्तावस्थेत असलेल्या विश्वाचे मीच प्रकटीकरण करतो, त्याचे पालन करतो व कल्पांती पुन्हा माझ्यात सामावून घेतो. विश्वाच्या संचालनासाठी आवश्यक असलेले तेज मी पुरवतो. त्यासाठी सर्व औषधी व विश्व यांना तेजाने युक्त करतो. सर्व इंद्रियांचे ठिकाणी अधिष्ठान करून आणि जठरातील धनंजय अग्नीचे ठिकाणी अधिष्ठान करून मी पुण्य व पाप यांनी रहित होऊन सर्व भोग भोगतो. ह्या अर्थाचे हे दोन श्लोक
अहमेवाखिलं विश्वं सृजामि विसृजामि च । औषधीस्तेजसा सर्वा विश्वं
चाप्याययाम्यहम् ।।37 ।। सर्वेन्द्रियाण्यधिष्ठाय जाठरं च धनंजयम् । भुनज्मि
चाखिलान्भोगान्पुण्यपाप विवर्जितऽ ।। 38 ।। आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार अग्नी, सूर्य, चंद्र, तारका, विद्वान ब्राह्मण यांच्या ठिकाणी जे तेज असते ते ईश्वराचेच असते. ईश्वराकडून मिळालेल्या तेजामुळे जर या वस्तू आपल्याला एव्हढ्या तेज्जपुंज दिसत असतील तर ईश्वराचे तेज किती असेल याची आपण कल्पना करू शकतो. सूर्य हा शक्तीचा मोठा स्त्राsत असून त्याच्यामुळे सृष्टीचे जीवनचक्र चालते. चंद्रामुळे सर्वांना शीतलता मिळते तसेच वनस्पतीत औषधी गुणधर्म नैसर्गिकरित्या निर्माण होतात. विश्वाचे प्रकटीकरण करणे, चालवणे व वेळ आल्यावर स्वत:मध्ये सामावून घेणे या गोष्टी ईश्वरच करत असतात. आणि त्यांच्या वागण्यातून सर्वश्रेष्ठ कर्मयोगी कसा असावा हे दाखवून देत असतात. ईश्वर सर्वांचे हितचिंतक आहेत आणि आपण त्यांची लेकरं असल्याने सगळ्यांचं भलं व्हावं, अशीच त्यांची इच्छा असते. इथं भलं या शब्दाचा अर्थ कौटूंबिक अबादीआबाद एव्हढ्या मर्यादित अर्थाने घ्यायचा नसून प्रत्येकाचं आत्यंतिक क्षेम म्हणजे कायमचं भलं कशात आहे हे त्यांना माहित असल्याने त्याप्रमाणे ते प्रत्येकाचा जीवनक्रम त्यादिशेने वाटचाल करेल असा आखून देतात. त्या व्यवस्थेमध्ये चुकीला क्षमा नसते. त्यामुळे केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त भोगावेच लागते पण ते भोगतानासुद्धा ते भोग सुसह्य कसे होतील हेही ते पहात असतात. थोडक्यात त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव! त्वमेव विद्या च द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वम् मम देवदेवं!! ही प्रार्थना ईश्वर जगत असलेल्या प्रत्येक भूमिकेचा अभ्यास करूनच तयार केलेली आहे. यातील शब्दनशब्द खरं आहे. पुढील श्लोकात बाप्पा सांगतायत की, विश्वाची निर्मिती मी केलेली आहेच आणि इतर देवीदेवतांची निर्मितीही मीच केलेली आहे.
अहं विष्णुश्च रुद्रश्च ब्रह्मा गौरी गणेश्वरऽ ।
इन्द्राद्या लोकपालाश्च ममैवांशसमुद्भवाऽ ।। 39।।
अर्थ- मी विष्णु आहे, रुद्र आहे, ब्रह्मदेव, गौरी, गणेश आहे. इंद्रादि लोकपाल देखील माझ्याच अंशापासून उत्पन्न झालेले आहेत.
विवरण- जर सृष्टीच्या प्रकटीकरणाला, पालन करण्याला आणि ती पुन्हा स्वत:मध्ये सामावून घेण्याला ईश्वर समर्थ असेल तर इतर देवीदेवतांची निर्मिती का केली असेल असे वाटते. त्याचे स्पष्टीकरण असे, त्यामागे ईश्वराचा एक विशिष्ठ हेतू आहे. ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या कार्यालयात सर्व छोटीमोठी कार्ये व्यवस्थित चालावीत म्हणून त्याचे अनेक विभाग करून त्या प्रत्येक विभागावर एक विभागप्रमुख नेमलेला असतो आणि तो विभाग सुव्यवस्थित चालवण्याची जबाबदारी त्या विभागप्रमुखाकडे दिलेली असते. त्यानुसार विश्वचालन करण्यासाठी निरनिराळे विभाग करून त्यावर देखरेख करण्यासाठी ईश्वराने निरनिराळ्या देवी, देवतांची निर्मिती केली आहे.
क्रमश: