भारताच्या चौघीजण टायब्रेकरमध्ये खेळणार
महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा : दिव्या, हरिका, हंपी, वैशालीचा समावेश
वृत्तसंस्था/vबातुमी, जॉर्जिया
आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखला येथे सुरू असलेल्या फिडे विश्व महिला बुद्धिबळ चषक स्पर्धेतील उपउपांत्यपूर्व फेरीतील परतीच्या सामन्यात चीनच्या झु जिनेरने हरविले. भारताच्या चारही महिलांना पुढील फेरी गाठण्यासाठी टायब्रेकरवर खेळावे लागणार आहे.
उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या प्रयत्नात असणारी ती एकमेव भारतीय होती. पण तिची संधी थोडक्यात हुकली. स्कॉच ओपनिंगमध्ये डावाच्या मध्यावर तिची मजबूत स्थिती होती. पण तिला त्याचा लाभ घेता आला नाही. मात्र तिला आणखी एक संधी मिळणार आहे. कारण तिने पहिला डाव जिंकला होता. आता त्यांच्यात टायब्रेक लढत होईल. कोनेरू हंपीने आणखी एक डाव अनिर्णीत राखताना अलेक्झांड्रा कोस्टेनियुकला बरोबरीत रोखले तर डी हरिकानेही कॅटरीना लॅग्नोला बरोबरीत रोखले आणि कझाकच्या मेरुअर्टने भारताच्या आर. वैशालीला बरोबरीत रोखून लढत टायब्रेकरवर नेली.
दरम्यान, चीनच्या तीन खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. लेइ टिंगजीने उझ्बेकच्या उमिदा ओमोनोव्हाला सहजपणे बरोबरीत रोखले तर सॉग युझिननेही जॉर्जियाच्या लेला जावाखिश्विलीविरुद्धचा डाव अनिर्णीत ठेवला आणि टॅन झाँगयीने युलिया ओस्माकविरुद्ध दुसरा डाव अनिर्णीत राखत आगेकूच केली. तिघींनीही पहिला डाव जिंकला होता. स्थानिक खेळाडू नॅना डॅग्नाईझने युक्रेनच्या मारिया मुझीचुकला पराभवाचा धक्का देत सनसनाटी निकाल दिला.
फिडे महिला विश्वचषक स्पर्धा बाद पद्धतीची असून प्रत्येक फेरीत दोन डाव खेळले जातात. बरोबरी झाल्यास टायब्रेकवर लढत निकाली केली जाते. भारताच्या चारजणी टायब्रेकरमध्ये खेळणार आहेत. या स्पर्धेसाठी एकूण 691250 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस असून विजेत्याला 50,000 अमेरिकन डॉलर्स मिळणार आहेत. याशिवाय पुढील महिला कँडिडेट्स स्पर्धेसाठी तीन जागा या स्पर्धेतून निश्चित होणार आहेत. कँडिडेट्स स्पर्धेतून पुढील महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपची चॅलेंजर खेळाडू निश्चित होणार आहे.