साऱ्यांच्या नजरा राजभवनाकडे..!
मंत्री गोविंद गावडे यांना हटविल्यानंतर उलटसुलट तर्कवितर्कांना ऊत : गावडेंची आणखी गोची करण्यासाठी सतरकर राज्य कार्यकारिणीवर
पणजी : क्रांतिदिनाचा मुहूर्त साधून वादग्रस्त मंत्री गोविंद गावडे यांचे मंत्रिपद काढून घेतल्यानंतर काल गुऊवारपासून राज्याच्या सत्ता संघर्षाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. आणखी कोणत्या मंत्र्याला धक्का बसणार, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याचे तर्कवितर्क अनेकजण लावत आहेत. आता साऱ्यांच्या नजरा राजभवनाकडे खिळल्या असून, मंत्रिमंडळातील विद्यमान कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आणि कोणत्या नव्या मंत्र्यांची वर्णी लागणार यासाठी आतापासूनच राजकीय तज्ञ अंदाज बांधू लागले आहेत. राज्याच्या सत्ता संघर्षाच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी गुऊवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शांत आणि हसऱ्या चेहऱ्याने पत्रकारांना सामोरे गेले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करण्याचे टाळले असले तरी लवकरच आणखी निर्णय घेऊ, असे सांगून त्यांनी अनेकांना धक्का दिला आहे. बुधवारी मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गुऊवारी भाजपच्या मुख्यालयात दिवसभर हजेरी लावली. या दिवसभराच्या काळात त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सायंकाळी भाजपची राज्य कार्यकारी समिती जाहीर केली आणि लागलीच ते मडगावला निघून गेले.
शहाँजहाँनला कमळाच्या सुगंधाची नशा...
भाजपची कार्यकारिणी समिती जाहीर करताना प्रियोळ भाजपचे खंदे नेते अॅङ विश्वास सतरकर यांना समितीवर उपाध्यक्षपद देऊन आमदार गोविंद गावडे यांची आतापासूनच गोची केलेली आहे. त्यामुळे शहाँजहाँनचे उदाहरण देणाऱ्या गोविंद गावडे यांना चाफ्याचा नव्हे; तर ‘कमळा’चा ‘सुगंध’ नक्कीच नशा देणारा ठरणार आहे.
फटाके वाजवून आनंदोत्सव
गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून काढल्यानंतर भाजपच्या निस्सीम कार्यकर्त्यांमध्ये भलताच आनंद व्यक्त करण्यात येत आहे. माशेल येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गोविंद गावडे यांना हटविण्याबाबत भाजपने घेतलेल्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. नवीन मंत्री कोण असेल? त्यांचा शपथविधी केव्हा होईल? याबाबत जनतेमध्ये कमालीचे औत्सुक्य आहे. नवीन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करणे वा एखाद्याला मंत्रिमंडळातून काढून टाकणे याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे पत्रकारांना सामोरे जाताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शांत आणि हसऱ्या चेहऱ्याने सामोरे गेल्याचे दिसून आले.
गोविंद गावडे यांच्याबाबतचा निर्णय माझा : मुख्यमंत्री
गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझा आहे. बुधवारी सायंकाळी माझ्या शिफारसीनंतर गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून काढण्यात येत असल्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना कळविण्यात आले होते, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पक्षविरोधी भूमिका खपवून घेतली जाणार नाहीच : दामू नाईक
“मंत्रिमंडळातील कोणताही निर्णय हा मुख्यमंत्री हेच घेत असतात. गोविंद गावडे यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत केले आहे. कारण पक्षशिस्त आणि पक्षाच्या विरोधात कुणीही भूमिका घेत असेल तर ते प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी कधीच खपवून घेणार नाही. कारण पक्ष प्रथम नंतर आपण, ही भूमिका प्रत्येकाने पाळायलाच हवीच, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले.
मुख्यमंत्र्यांमुळेच आम्ही आहोत मंत्री : बाबुश
मुख्यमंत्री हेच सरकारचे प्रमुख नेतृत्व असते. त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाला ठेवायचे, कुणाला नाही ठेवायचे हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आम्ही मंत्रिमंडळातील सर्व नेते मुख्यमंत्र्यांमुळेच आहोत, अशी सावध प्रतिक्रिया महसूल तथा कामगारमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी दिली.
डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर हवी : ढवळीकर
प्रियोळ मतदारसंघाचे माजी आमदार तथा ‘मगो’ पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून काढल्यानंतर सावध भूमिका घेतली आहे. भाजप पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे. त्यामुळे गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकणे हा सर्वस्वी भाजप पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे आपण या निर्णयावर काहीच भाष्य करू शकत नाही. राजकारण्यांनी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवूनच विधाने करायला हवीत, असे दीपक ढवळीकर म्हणाले.
सरकारच्या भूमिकेबाबत साशंकता : पाटकर
आदिवासी कल्याण खात्यामध्ये चालणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत भाष्य केल्याने गावडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आल्याचे दिवसभर बोलले जात होते. परंतु विद्यमान मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले असताना त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सरकारने आदिवासी समाजाचे प्रमुख नेते असलेल्या गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून हटवल्यामुळे सरकारच्या भूमिकेबाबत साशंकता आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मत व्यक्त केले.