माणसाने मनातले सर्व संशय आत्मज्ञानाने छेदून टाकावेत
अध्याय तिसरा
बाप्पा म्हणाले, मनुष्याचा स्वभाव सत्व, रज आणि तम ह्या गुणांनी बनलेला असतो. सत्व गुण जास्ती असलेला सात्विक माणूस ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्याची भक्ती करत असतो आणि त्याला अनुरूप अशी त्याची वर्तणूक होत असते. त्यामुळे त्याचे भले होते. रजोगुणी माणसाला फक्त स्वत:चा स्वार्थ कळत असल्याने त्याला चांगले काय, वाईट काय हेच कळत नसते. तो सदोदित काही ना काही मिळवण्याच्या मागे असतो व त्यातच त्याचे आयुष्य संपून जाते. तमोगुणी मनुष्य स्वत:शिवाय इतर कशाचेच अस्तित्व मान्य करत नसल्याने ईश्वर अस्तित्वात नाही अशी त्याची ठाम समजूत असते. रजोगुणी व तमोगुणी माणसं भक्तीहीन व श्रध्दाहीन असल्याने ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल संशयी असतात. त्यांना धड इथं सुख मिळत नाही व परलोकातही ते सुखी राहू शकत नाहीत. म्हणून माणसाने संतसंगती आणि देवभक्ती करून त्याच्या स्वभावातल्या सत्वगुणाची वाढ करावी म्हणजे त्याचा स्वभाव संशयरहित होऊन त्यांची आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याच्या दिशेने वाटचाल सुरु होईल. आपण कर्ते नाही आणि समोर दिसणारी दुनिया मिथ्या आहे ह्याची खात्री पटलेल्या सिद्ध पुरुषाचा संशय पूर्णपणे फिटलेला असल्याने त्याला कर्मे बंधनकारक ठरत नाहीत असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
आत्मज्ञानरतं ज्ञाननाशिताखिलसंशयम् ।
योगास्ताखिलकर्माणं बध्नन्ति भूप तानि न ।।49 ।।
अर्थ- हे भूपा, आत्मज्ञानाचे ठिकाणी रत असलेल्या, ज्ञानाचे योगाने ज्याने सर्व संशयांचा नाश केला आहे, ज्याची सर्व कर्मे अस्त पावली आहेत, अशा मनुष्याला कर्मे बद्ध करत नाहीत. विवरण- संशय, तो एकदा मनुष्याच्या डोक्यात घर करून बसला की, त्याची काही केल्या निवृत्ती होत नाही. त्यामुळे मनुष्य स्वत:च तयार केलेल्या संशयाच्या भोवऱ्यात फिरत राहतो. त्यात साधकाचा बुद्धिभेद होण्याला अनेक कारणे असतात. त्यातील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याने मिळवलेली लौकिक विद्या. म्हणजे शाळा कॉलेजातील शिक्षण. त्यामुळे त्याला आपल्याला सगळं कळतंय असा भ्रम झालेला असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्याने आत्मज्ञान प्राप्त करून घेतले आहे त्याला ईश्वराच्या सर्वव्यापी अस्तित्वाची तसेच गीतेच्या नवव्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेल्या त्यांच्या दिव्ययोगाप्रमाणे समोरचा दृश्य संसार हा खोटा असून एक ईश्वर हाच काय तो खरा आहे याची बालंबाल खात्री पटलेली असते. अशा सिद्ध पुरुषाला त्याने केलेली कर्मे बंधनकारक ठरत नाहीत. म्हणून मनुष्याने आत्मज्ञानाची साधना करावी आणि ज्ञानरुपी खड्गाने संशय नष्ट करून कर्मयोगाचे आचरण करावं असं बाप्पा या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात सांगत आहेत.
ज्ञानखड्गप्रहारेण संभूतामज्ञतां बलात् ।
छित्वान्तऽसंशयं तस्माद्योगयुक्तो भवेन्नरऽ ।।50।।
अर्थ-उत्पन्न झालेल्या अज्ञानाला आणि मनामध्ये असलेल्या संशयाला ज्ञानरूपी खड्गाच्या प्रहाराने छेदून टाकून मनुष्याने योगयुक्त व्हावे. बाप्पा म्हणतायत ज्ञानोपासना करून माणसाने मनातल्या सर्व संशयाना ज्ञान खड्गाने छेदून टाकावे. जेव्हा मनुष्य आत्मज्ञानाची किंवा ब्रह्मज्ञानाची उपासना करतो तेव्हा ईश्वरप्राप्ती ह्या एकमेव ध्येयासाठी तो सर्व प्रयत्न करत असतो. असे प्रयत्न चालू असताना त्याचा बुद्धिभेद करायला अनेकजण टपलेले असतात. त्या सर्वांना बाजूला करून त्यानं आत्मज्ञान मिळवलेलं असतं. अशा सिद्ध पुरुषाला बाप्पा सांगतायत की, तुझ्या आत्मज्ञानरुपी खड्गाचा उपयोग करून इथून पुढे निर्माण होणाऱ्या संशयांचे तू तुकडे तुकडे करून टाक आणि लोककल्याणकारी कर्मे करून कर्मयोगाचे आचरण कर.
श्री गणेशगीता तिसरा अध्याय समाप्त