For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्व साधनांमध्ये असावी भारताची ‘चिप’

06:46 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
सर्व साधनांमध्ये असावी भारताची ‘चिप’
Advertisement

पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली महत्वाकांक्षा, ‘सेमीकॉन इंडिया-2024’चे केले उद्घाटन

Advertisement

वृत्तसंस्था / नोयडा

इलेक्ट्रॉनिक साधनांचे उत्पादन कोठेही होवो, पण जगातील सर्व इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये ‘मायक्रोचिप’ भारताचीच असावी, अशी महत्वाकांक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. नोयडा येथे ‘सेमीकॉन इंडिया-2024’ या तीन दिवशीय परिषदेचे उद्घाटन बुधवारी त्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगीच्या भाषणात त्यांनी भारताला सेमीकंडक्टर उत्पादनाचे महाकेंद्र बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. भारतात यासाठी वातावरण अत्यंत अनुकूल असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

Advertisement

सेमीकॉन इंडिया हा कार्यक्रम भारताच्या सेमीकंडक्टर धोरणाचा जगाला परिचय करुन देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. येत्या दशकभराच्या काळात सेमीकंडक्टर किवा मायक्रोचिप उत्पादनात भारताला जगात अग्रगण्य स्थान मिळावे, यासाठी केंद्र सरकारने व्यापक योजना सज्ज केली असून ती या परिषदेत सादर केली जाणार आहे. या क्षेत्रात जगभरातून गुंतवणूक आकृष्ट केली जाणार आहे. या परिषदेला जगभरातील मान्यवर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

85 हजार उच्चशिक्षितांचे कार्यदल

सेमीकंडक्टर किंवा अन्य अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि साधने यांच्या उत्पादनासाठी भारत हे योग्य स्थान आहे. या उत्पादनांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी आणि मानवबळ भारतात उपलब्ध आहे. भारताला या क्षेत्रात ‘पॉवरहाऊस’ बनविण्यासाठी जे करण्याची आवश्यकता आहे, ते सर्व करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. आम्ही 85 हजार उच्चशिक्षित युवकांचे कार्यदल यासाठी सज्ज करीत आहोत. या दलात इंजिनिअर्स, संशोधक आणि तंत्रज्ञ असतील. या दशकाच्या अखेरपर्यंत देशात इलेक्ट्रॉनिक क्षेत्राची उलाढाल 500 अब्ज डॉलर्सपर्यंत (साधारणपणे 45 लाख कोटी रुपये) पोहचविण्याचे आमचे ध्येय आहे. सध्या ही उलाढाल 150 अब्ज डॉलर्स किंवा साधारणत: 13 लाख कोटी रुपयांची आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दिली.

दीड लाख कोटी रुपये राखून

या क्षेत्राचा भारतात व्यापक विकास आणि विस्तार व्हावा, यासाठी भारताने प्राथमिक गुंतवणुकीच्या रुपात दीड लाख कोटी रुपयांचा निधी राखून ठेवलेला आहे. सेमीकंडक्टर उत्पादनासंबंधी अनेक योजना सध्या साकारल्या जात आहेत. भारत सेमीकंडक्टर उत्पादनात जगात अग्रेसर देश व्हावा हे ध्येय असून ते साध करण्यात आम्हाला यश येईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

तंत्रज्ञानाचे ‘लोकशाहीकरण’ व्हावे

उच्च आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ‘लोकशाहीकरण आणि सावत्रिकीकरण’ व्हावे हे आमचे ध्येय आहे. उच्च तंत्रज्ञानावर कोणाचाही एकाधिकार असू नये. भारतात इलेक्ट्रॉनिक क्रांती व्हावी यासाठी डिजिटल अभियान आणि दूरसंचार अभियान यांसारख्या योजना यशस्वीरित्या साकारल्या गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हाती उच्च तंत्रज्ञान आले आहे. आता या क्षेत्रात वेगवान विकासासाठा सज्ज आहोत, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले.

60 वर्षांपूर्वीच प्रारंभ, पण...

सेमीकंडक्टर निर्मितीच्या योजनेचा प्रारंभ भारतात खरेतर 60 वर्षांपूर्वीच करण्यात आला होता. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या पूर्वी अनेकदा ही योजना चालू आणि बंद अशा स्थितीत राहिली. धोरणात सातत्य नसल्याने आणि गंभीरपणा नसल्याने या क्षेत्रात भारत आघाडी घेऊ शकला नाही. मात्र गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ही योजना एका निश्चित टप्प्यावर येऊन पोहचली आहे. 60 वर्षांपूर्वीपासूनच असे सातत्य दाखविण्यात आले असते, तर आज भारताला या क्षेत्रात जगाचे नेतेपद मिळाले असते. तथापि, धोरण अनिश्चित असल्याने तसे होऊ शकले नाही. गेल्या 10 वर्षांमध्ये मात्र, धोरणसातत्य आणि सर्वोच्च पातळीवरुन पुढाकार यामुळे आम्ही देशात योग्य ती वातावरण निर्मिती करु शकलो आहोत. आता सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात भारत ‘हनुमानउडी’ घेण्यास सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन वैष्णव यांनी त्यांच्या भाषणात केले आणि भारताच्या योजनांची माहिती दिली.

अग्रभागी राहण्याचे ध्येय

ड सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात अग्रभागी राहण्याचे भारताचे ध्येय

ड प्रारंभीच्या काळात 85 हजार उच्चशिक्षित तंत्रज्ञांचे कार्यदल निर्माण होणार

ड इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उलाढाल दशकाअखेरीपर्यंत 500 अब्ज डॉलर्स होणार

Advertisement
Tags :

.