भाजपचे सर्व उमेदवार निश्चित
आचारसंहिता लागू झाल्यानंतर करणार जाहीर : प्रचारात विकासकामांवर भर देण्याचा निर्णय
पणजी : आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ‘माझे घर’ योजना व सरकारने केलेल्या विकासकामांवर भर देणार आहे. उमेदवार निश्चित करण्यात आले असून निवडणुकीचा सविस्तर तपशीलवार कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा करण्याचे ठरवण्यात आले आहे. भाजपने जि. पं.निवडणुकीची जोरदार तयारी केली असून काल सोमवारी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत प्रचार व रणनितीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली.
जि. पं. निवडणूक हा मुख्य विषय चर्चेसाठी होता आणि त्यावर विचारविनिमय झाला. दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी 25मतदारसंघ म्हणजे एकूण 50 मतदारसंघात निवडणूक होणार असून त्यास सर्व जागा लढवण्याचे निश्चित करण्यात आले. पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी ही निवडणूक होणार असल्याने जि. पं. साठी भाजपने महत्त्व दिले आहे. त्यातून भाजपला मतदारांचा व मतदानाचा अंदाज येणार असून भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी अशा सर्वांना भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी कामाला लावण्याचे ठरवण्यात आले. तसेच आचारसंहिता लागू झाल्यावर उमेदवार जाहीर करण्यात येणार आहेत.