For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकच्या मालिका विजयाचे शिल्पकार अली-खान

06:50 AM Oct 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकच्या मालिका विजयाचे शिल्पकार अली खान
Advertisement

इंग्लंडचा 9 गड्यांनी पराभव, साजीद खान ‘मालिकावीर’, सौद शकील ‘सामनावीर’

Advertisement

वृत्तसंस्था / रावळपिंडी

यजमान पाकिस्तानने शनिवारी येथे खेळाच्या तिसऱ्या दिवशी अंतिम कसोटीत इंग्लंडचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करुन तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. फिरकी गोलंदाज नौमन अली आणि साजीद खान हे पाकच्या मालिका विजयाचे शिल्पकार ठरले. शेवटच्या कसोटीत शतक झळकविणाऱ्या सौद शकीलला ‘सामनावीर’ तर या शेवटच्या कसोटीत नौमन अली आणि साजीद खान यांनी इंग्लंडचे 19 गडी बाद केले. या मालिकेत 72 धावांत 19 बळी मिळविणाऱ्या साजीद खानला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या शेवटच्या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 267 धावा जमविल्यानंतर पाकने पहिल्या डावात 344 धावा केल्या. पाकने इंग्लंडवर 77 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर पाकच्या फिरकी माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव 37.2 षटकात 112 धावा उखडला. पाकला निर्णायक विजयासाठी 36 धावांची जरुरु होती आणि पाकने दुसऱ्या डावात 3.1 षटकात 1 बाद 37 धावा जमवित इंग्लंडचा खेळाच्या तिसऱ्या दिवशी 9 गड्यांनी दणदणीत पराभव केला.

इंग्लंडने 3 बाद 24 या धावसंख्येवरुन शनिवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. पण पहिल्या सत्रातील तासभराच्या खेळात इंग्लंडने आणखी 4 गडी गमविले. रुटने 52 चेंडूत 1 चौकारासह 33, ब्रुकने 40 चेंडूत 2 चौकारांसह 26 तर डकेटने 15 चेंडूत 2 चौकारांसह 12, अॅटकिनसन आणि लिच यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. पाकतर्फे नौमन अलीने 42 धावांत 6 तर साजीद खान 69 धावांत 4 गडी बाद केले. पाकच्या फिरकीसमोर इंग्लंडचे 7 गडी 88 धावांत बाद झाले. उपाहारापूर्वी पाकने विजयाचे उद्दिष्ट गाठले. पाकच्या दुसऱ्या डावात कर्णधार शहा मसूदने 6 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 23 तर शफीकने नाबाद 5 धावा जमविल्या. सईम आयुब 8 धावांवर पायचित झाला.

या मालिकेत इंग्लंडने महिला सामना 1 डाव आणि 47 धावांनी जिंकून पाकवर आघाडी घेतली होती. पण त्यानंतर नौमन अली आणि साजीद खान यांच्या फिरकीच्या जोरावर पाकने दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी केली होती. रावळपिंडीच्या शेवटच्या कसोटीत इंग्लंडची भक्कम फलंदाजी पाकच्या फिरकीसमोर कोलमडली. पाकिस्तानच्या भूमीत इंग्लंडची कसोटीतील ही निच्चांकी धावसंख्या आहे. यापूर्वी म्हणजे 1987 साली लाहोरमध्ये झालेल्या कसोटीत इंग्लंडचा डाव 130 धावांत आटोपला होता. 2021 नंतर पाकने आपल्या घरच्या भूमीवर ही पहिली कसोटी मालिका जिंकली आहे. 2021 साली पाकने द. आफ्रिकेचा कसोटी मालिकेत 2-0 असा पराभव केला होता. पाकचा कर्णधार शान मसूदने संघाच्या कप्तानपदाची धुरा सांभाळल्यानंतर सलग सहा कसोटी सामने गमविले होते. दोन वर्षांपूर्वी इंग्लंड संघाने स्टोक्सच्या नेतृत्वाखाली पाकच्या दौऱ्यात यजमान पाकचा 3-0 असा कसोटी मालिकेत व्हाईटवॉश केला होता. या पराभवाची परतफेड पाकने यावेळी केली. मसूदच्या नेतृत्वाखाली पाकचा हा पहिला कसोटी मालिका विजय आहे. मसूदच्या नेतृत्वाखाली पाकला ऑस्ट्रेलियाकडून 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. तर त्यानंतर बांगलादेशने पाकच्या कसोटी मालिकेत 2-0 असा व्हाईटवॉश केला होता. हा मालिका विजय आपण पाकच्या जनतेला अर्पित करत असल्याचे कर्णधार शान मसूदने म्हटले आहे.

संक्षिप्त धावफलक: इंग्लंड प. डाव : सर्वबाद 267, (साजीद खान 6-128, नौमन अली 3-88), पाक. प. डाव सर्वबाद 344, इंग्लंड दु. डाव 37.2 षटकात सर्वबाद 112 (रुट 33, ब्रुक 26, डकेट 12, अॅटकिनसन 10, लीच 10, नौमन अली 6-42, साजीद खान 4-69), पाक दु. डाव 3.1 षटकात 1 बाद 37 (शान मसूद नाबाद 33, शफीक नाबाद 5, आयुब 8, लीच 2-1)

Advertisement
Tags :

.