अल्कारेझ, झाराझुआ, मुचोव्हा, क्रेसिकोव्हा दुसऱ्या फेरीत
टायफो, फोनेस्का विजयी, मॅडिसन कीज, क्विटोव्हा, व्हीनस विल्यम्स, गार्सिया स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
येथे सुरू असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत कार्लोस अल्कारेझने दुसरी फेरी गाठली तर अमेरिकेची मॅडिसन कीज, व्हीनस विल्यम्स, पेत्र क्विटोव्हा, कॅरोलिन गार्सिया यांचे आव्हान संपुष्टात आले. क्विटोव्हा व गार्सिया यांनी या लढतीनंतर निवृत्तीची घोषणा केली.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या सहाव्या मानांकित मॅडिसन कीजला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत 82 व्या स्थानावर असणाऱ्या मेक्सिकोच्या रेनाटा झाराझुआने तिला 6-7 (10-12), 7-6 (7-3), 7-5 असे हरविले. तीन तास 10 मिनिटे ही झुंज रंगली होती. कीजने या सामन्यात खूप चुका केल्याने तिला पराभव स्वीकारावा लागला. झाराझुआने केवळ आठ विजयी फटके मारत कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळविला. यापूर्वी तिने आठ ग्रँडस्लॅममध्ये भाग घेतला होता. पण आठही वेळा तिला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. टॉप टेनमधील सहा खेळाडूंशी तिची यापूर्वी गाठ पडली होती. पण एकदाही तिला विजय मिळविता आला नव्हता.
दोन वेळची विम्बल्डन चॅम्पियन पराभूत
35 वर्षीय पेत्र क्विटोव्हाने दोन वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. पण येथे तिला डायने पेरीने तिचा 6-1, 6-0 असा एकतर्फी धुव्वा उडविला. मुलाच्या जन्मानंतर क्विटोव्हाने जुलै 2024 मध्ये पुनरागमन केले होते. या वर्षीच्या सुरुवातीलाच तिने यूएस ओपन स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले होते. तिने 2011 व 2014 मध्ये विम्बल्नड स्पर्धा जिंकली होती. याशिवाय 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया ओपनची ती उपविजेती आहे. जागतिक क्रमवारीत तिने दुसऱ्या क्रमांकापर्यंत झेप घेतली होती. फ्रान्सच्या 31 वर्षीय कॅरोलिन गार्सियानेही पराभवानंतर निवृत्ती जाहीर केली. तिला कॅमिला रखिमोव्हाने तिला 6-4, 4-6, 6-3 असे हरवित दुसरी फेरी गाठली.
दोन वर्षानंतर ग्रँडस्लॅममध्ये खेळणाऱ्या वयस्कर व्हीनस विल्यम्सलाही कॅरोलिना मुचोव्हाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. मुचोव्हाने ही लढत 6-3, 2-6, 6-1 अशी जिंकली. व्हीनसने ही स्पर्धा 2000 व 2001 मध्ये जिंकली होती. झेक प्रजासत्ताकच्या बार्बरा क्रेसिकोव्हाने दुसरी फेरी गाठताना कॅनडाच्या व्हिक्टोरिया एम्बोकोचा 6-3, 6-2 असा पराभव केला.
पुरुष एकेरीत नव्या बझ कटमध्ये उतरलेल्या कार्लोस अल्कारेझने रीली ओपेल्कावर 6-4, 7-5, 6-4 अशी मात करीत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. त्याचा नवा हेअरकट चर्चेचा विषय बनला होता. दुसऱ्या फेरीत त्याचा मुकाबला इटलीच्या मॅटिया बेलुसीशी होईल. चीनच्या शांग जुनचेंगने माघार घेतल्यामुळे बेलुसीला पुढील फेरीत स्थान मिळाले. अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफोने जपानच्या योशिहितो निशिओकाचा पराभव केला. अन्य एका सामन्यात ब्राझीलच्या जोआव फोनेस्काने या स्पर्धेतील पदार्पणात मिओमिर केसमानोविचवर 7-6 (7-3), 7-6 (7-5), 6-3 अशी मात केली.