For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्कारेझ सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन जेता

06:57 AM Jul 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
अल्कारेझ सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन जेता
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

2024 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने सर्बियाच्या जोकोविचचा सरळ सेट्समध्ये पराभव करत सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकाविले. गेल्या वर्षी अल्कारेझने जोकोविचचा पराभव करुन पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली होती.

अल्कारेझ आणि अनुभवी जोकोविच यांच्यातील ही लढत पाच सेट्सपर्यंत लांबेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण विम्बल्डन ग्रासकोर्टवरील जोकोविचच्या वर्चस्वाला चोख प्रत्युत्तर देताना अल्कारेझने आपल्या वेगवान सर्व्हिसच्या जोरावर जोकोविचचे आव्हान 6-2, 6-2, 7-6 (7-4) अशा सेट्समध्ये संपुष्टात आणले. गेल्या वर्षी या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यांची पुनरावृत्ती यावेळी पुन्हा झाली होती. आता अल्कारेझने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. 2023 आणि 2024 साली त्याने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा, 2022 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा तर गेल्या महिन्यात त्याने 2024 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले आहे.

Advertisement

या सामन्यातील पराभवामुळे सर्बियाच्या जोकोविचला बऱ्याच पिछाडीवर जावे लागले. जोकोविचने यापूर्वी 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली होती आणि त्याने यावेळी 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवून अमेरिकेच्या मार्गारेट कोर्टचा 24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदाचा विक्रम मागे टाकण्याची संधी गमावली. तसेच विम्बल्डन स्पर्धेत स्विसच्या रॉर्जर फेडररने आठ वेळेला जेतेपद मिळविण्याच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी जोकोविचने गमाविली. जोकोविचच्या या मार्गक्रमणात स्पेनचा अल्कारेझ प्रमुख अडथळा ठरला.

रविवारचा हा अंतिम सामना सुरु झाल्यानंतर तब्बल 14 मिनिटे चाललेल्या पहिल्या गेममध्ये अल्कारेझने जोकोविचची सर्व्हिस भेदली. त्याने पाचव्या ब्रेकपॉईंटवर हा गेम जिंकला. तृतीय मानांकित 21 वर्षीय अल्कारेझने पहिल्या सेटमध्ये आपले पूर्णपणे वर्चस्व ठेवताना जोकोविचला केवळ 2 गेम्स जिंकण्याची संधी दिली. आपल्या वेगवान सर्व्हिसच्या जोरावर अल्कारेझने जोकोविचवर भक्कम आघाडी मिळवली. दुसरा सेट सुरु झाल्यानंतर अल्कारेझने सुरुवातीपासूनच जोकोविचवर दडपण ठेवण्यात यश मिळविले. मात्र जोकोविच या संपूर्ण सामन्यात स्वत:ची सर्व्हिस राखण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. अल्कारेझने पहिले दोन सेट्स सहजपणे जिंकून आघाडी घेतल्यानंतर तिसरा सेट मात्र चुरशीचा झाला. हे दोन्ही खेळाडू 4-4 असे बरोबरीत राहिले. त्यानंतर अल्कारेझने जोकोविचची सर्व्हिस भेदत 5-4 अशी आघाडी मिळवली. दरम्यान अल्कारेझने 40-0 अशी आघाडी मिळवली होती. पण त्याला 3 मॅच पॉईंट्सचा लाभा घेता आला नाही. त्यामुळे त्याने आपली सर्व्हिस गमावली. हा शेवटचा सेट त्यामुळे टायब्रेकरमध्ये गेला. टायब्रेकरमध्ये अल्कारेझ थोडा निराश दिसत होता. पण त्याने आपल्या नैराशेवर नियंत्रण ठेवले. अखेर अल्कारेझच्या फटक्यावर जोकोविचला परतीचा फटका अचूक न मारता आल्याने अल्कारेझने शेवटचा पॉईंट घेत स्पर्धेच्या अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले.

Advertisement
Tags :

.