अल्कारेझ, व्हेरेव्हची विजयी सलामी
वृत्तसंस्था / ट्युरीन
येथे सुरू झालेल्या निटो एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अॅलेक्झांडर व्हेरेव्हने अमेरिकेच्या बेन शेल्टनचा पराभव करत आपल्या मोहिमेला विजयाने प्रारंभ केला. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका सामन्यात स्पेनच्या टॉपसिडेड कार्लोस अल्कारेझने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरला पराभवाचा धक्का देत विजयी सलामी दिली.
पॅरिसमध्ये अलिकडेच झालेल्या रोलॅक्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत व्हेरेव्हला इटलीच्या टॉपसिडेड सिनरकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी त्याला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर व्हेरेव्हचे या स्पर्धेसाठी पुनरागमन झाले आहे. व्हेरेव्हने शेल्टनचा 6-3, 7-6 (8-6) असा पराभव करत विजयी सलामी दिली. तृतिय मानांकीत व्हेरेव्हने आतापर्यंत ही स्पर्धा 2018 आणि 2021 साली अशी दोनवेळा जिंकली होती. दुसऱ्या एका सामन्यात स्पेनच्या अल्कारेझने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनॉरचा 7-6 (7-5), 6-2 असा पराभव केला. आता अल्कारेझचा पुढील सामना अमेरिकेचा फ्रित्झ किंवा मुसेटी यांच्याबरोबर होणार आहे. अल्कारेझने 2025 च्या टेनिस हंगामात एटीपी टूरवरील स्पर्धेत 68 सामने जिंकले असून 8 अजिंक्यपदे मिळविली आहेत.