अल्कारेझ सलग दुसऱ्यांदा अजिंक्य
पाच सेट्सच्या झुंजार लढतीत सिनरवर मात
वृत्तसंस्था/ पॅरिस
पाच तासांहून अधिक काळ रंगलेल्या चुरशीच्या अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने इटलीच्या अग्रमानांकित जेनिक सिनरचा पाच सेट्समध्ये पराभव करून फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद स्वत:कडेच राखले. राफेल नदाल व गस्टेव्ह कुएर्टिन यांच्यानंतर येथील स्पर्धेत जेतेपद स्वत:कडेच राखणारा अल्कारेझ हा या शतकातील तिसरा टेनिसपटू बनला आहे.
अल्कारेझने ही लढत 4-6, 6-7 (4-7), 6-4, 7-6 (7-3), 7-6 (10-2) अशी जिंकत कारकिर्दीतील पाचवे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. दोन सेट्सची पिछाडी भरून काढत अल्कारेझने अतिशय झुंजार खेळ करीत जेतेपद खेचून आणले. या स्पर्धेच्या इतिहासातील ही एक अविस्मरणीय मॅरेथॉन खेळी असल्याचे मानले जात आहे. ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पराभूत होण्याची सिनरची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या चार सेटमध्ये दोघांनी दोन-दोन सेट जिंकले होते. शेवटच्या निर्णायक सेटमध्ये बरोबरी झाल्यानंतर टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. शेवटच्या सेटमध्ये टायब्रेक झाल्यास सर्व ग्रँडस्लॅममध्ये सर्वप्रथम 10 गुण मिळविणाऱ्यास तसेच दोन गुणांच्या फरक असणाऱ्यास विजयी होता येते. 22 वर्षीय अल्कारेझने टायब्रेकमध्ये 10-2 अशी बाजी मारत एक संस्मरणीय विजय साकार केला.
सिनरने यापूर्वी 2023 यूएस ओपन, 2024 ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. पण येथे सलग तिसऱ्या वर्षी ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याची त्याची संधी मात्र हुकली. अल्कारेझ व सिनर यांच्यात आतापर्यंत 12 लढती झाल्या असून अल्कारेझने 8 तर सिनरने 4 लढती जिंकल्या आहेत. अलीकडेच त्याने इटालियन ओपनमध्येही सिनरला हरविले होते. ग्रँडस्लॅममधील सलग 20 सामन्यांची सिनरची विजयी मालिका मात्र येथे खंडित झाली.