अल्कारेझ, सिनर, स्वायटेक उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया (अमेरीका)
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या इंडियन वेल्स बीएनपी पेरीबस पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने जर्मनीच्या वेरेव्हचा पराभव करत एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. आता अल्कारेझ आणि इटलीचा जेनिक्स सिनेर यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. टॉमी पॉल आणि रशियाचा मेदव्हेदेव यांनीही शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले आहे. महिलांच्या विभागात पोलंडची इगा स्वायटेक, अमेरिकेची कोका गॉफ, युक्रेनची मार्टा कोस्ट्युक आणि मारिया सॅकेरी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अल्कारेझने जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर वेरेव्हचे आव्हान 6-3, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या एका सामन्यात इटलीच्या जेनिक सिनेरने जिरी लिहेकाचा 6-3, 6-3 असा फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. गेल्या जानेवारीमध्ये इटलीच्या सिनेरने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. अमेरिकेच्या टॉमी पॉलने नॉर्वेच्या नवव्या मानांकित कास्पर रुडचे आव्हान 6-2, 1-6, 6-3 असे संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेवने रोमानियाच्या रुनेचे आव्हान 7-5, 6-4 असे संपुष्टात आणत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले. मेदव्हेदेव आणि पॉल यांच्यात उपांत्य लढत होईल.
महिलांच्या विभागात पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने कॅरोलिनी वोझनियाकीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. दुखापतीमुळे वोझनियाकीने स्पर्धेतून माघार घेतल्याने स्वायटेकला पुढे चाल मिळाली. दुसऱ्या एका सामन्यात अमेरिकेच्या गॉफने युआन युएचा 6-4, 6-3, युक्रेनच्या मारटा कोस्ट्युकने रशियाच्या पोटापोव्हाचा 6-0, 7-5, मारिया सॅकेरिने इमा नेव्हारोचा 5-7, 6-2, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले.