For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्कारेझ-सिनेर आज जेतेपदासाठी लढत

06:50 AM Jul 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
अल्कारेझ सिनेर आज जेतेपदासाठी लढत
Advertisement

सर्बियाचा जोकोविच, अमेरिकेचा फ्रित्झ यांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था / विम्बल्डन

2025 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत स्पेनचा विद्यमान विजेता कार्लोस अल्कारेझ तसेच इटलीचा टॉपसिडेड जेनिक सिनेर यांनी पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. रविवारी यांच्यात पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. सर्बियाचा माजी टॉपसिडेड जोकोविच आणि अमेरिकेचा टेलर फ्रित्झ यांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले.

Advertisement

पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने अमेरिकेच्या टेलर फ्रित्झचा 6-4, 5-7, 6-3, 7-6 (8-6) अशा सेट्समध्ये पराभव केला. अल्कारेझ आता विम्बल्डन स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. अल्कारेझने यापूर्वी सलग दोनदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. अल्कारेझने आतापर्यंत 5 ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. गेल्या एप्रिलपासून अल्कारेझने पुरुष एकेरीचे सलग 24 सामने जिंकून आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. 2009 नंतर विम्बल्डन स्पर्धेत अंतिम फेरीत गाठण्याची संधी अमेरिकेच्या टेलर फ्रित्झला मिळाली होती. पण त्याचे आव्हान अल्कारेझने उपांत्य फेरीतच समाप्त केले. 2009 साली अमेरिकेच्या अँडी रॉडीकने या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.

या उपांत्य फेरीच्या लढतीत अल्कारेझने पहिला सेट 6-4 अशा फरकाने जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये फ्रित्झने अल्कारेझची दोनवेळा सर्व्हिस भेदत हा सेट 7-5 असा जिंकून बरोबरी साधली होती. तिसऱ्या सेटमध्ये फ्रित्झला अल्कारेझच्या सर्व्हिसवर केवळ एक गुण मिळविता आला. अल्कारेझने या सेट्समध्ये फ्रित्झची सर्व्हिस भेदत 2-1 अशी आघाडी मिळविली. फ्रित्झने या लढतीमध्ये वेगवान फोरहॅन्ड फटक्यांवर गुण मिळविले. त्याने 11 विजयी फटके मारले. तर अल्कारेझने 10 विजयी फटके नोंदविले. तिसरा सेट अल्कारेझने 6-3 असा जिंकून फ्रित्झवर पुन्हा आघाडी घेतली. उभयतांमधील चौथा सेट अपेक्षेप्रमाणे टायब्रेकरपर्यंत लांबला.  या सेटमध्ये अल्कारेझने व्हॅलीजवर अधिक भर दिला. अल्कारेझला फ्रित्झने हा चौथा सेट टायब्रेकरपर्यंत लांबवत विजयासाठी चांगलेच झुंजविले. अखेर अल्कारेझने आपल्या अनुभवाच्या जोरावर हा चौथा टायब्रेकरमधील सेट 7-6 (8-6) असा जिंकत फ्रित्झचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले.

सिनेर अंतिम फेरीत

इलटीच्या टॉपसिडेड जेनिक सिनेरने उपांत्य फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या माजी टॉपसिडेड नोव्हॅक जोकोविचचा 6-3, 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या उपांत्य लढतीत सिनेरच्या अचूक आणि वेगवान खेळासमोर जोकोविचची पुरती दमछाक झाली. सिनेरच्या वेगवान सर्व्हिससमोर जोकोविचच्या अनियंत्रित चुका झाल्याने त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. आता 23 वर्षीय सिनेर आणि 22 वर्षीय अल्कारेझ यांच्यात रविवारी पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल. 2025 च्या फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत सिनेर आणि अल्कारेझ यांच्यातच पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी लढत झाली होती. सिनेरने 2025 च्या टेनिस हंगामात सलग चौथ्या ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. सिनेरने गेल्या सप्टेंबरमध्ये अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा तर जानेवारीत ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. अल्कारेझ आणि सिनेर यांच्यात आतापर्यंत 12 लढती झाल्या असून त्यापैकी अल्कारेझने 8 तर सिनेरने 4 लढती जिंकल्या आहेत. अलिकडच्या कालावधीत अल्कारेझने सलग पाच सामन्यांत सिनेरला पराभूत केले आहे.

विम्बल्डन स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर जोकोविचने सिनेरच्या खेळाचे कौतुक केले. मात्र आणखी एकदा विम्बल्डन स्पर्धेत खेळण्याची इच्छा जोकोविचने व्यक्त केली. अल्कारेझ-फ्रित्झ तसेच सिनेर आणि जोकोविच यांच्यातील उपांत्य लढती पाहण्यासाठी माजी टेनिसपटू तसेच पाचवेळा विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविणारा बिजॉर्न बोर्ग तसेच लिनार्दो डी कॅप्रियो तसेच अॅना विंटॉर यांनी उपस्थिती दर्शविली होती. शुक्रवारी लंडनमध्ये चांगली उष्णता असल्याने टेनिसपटूंची दमछाक झाल्याचे जाणवले. लंडनमध्ये शुक्रवारी उष्णता मान 30 डिग्री सेल्सियस असल्याने शौकीनांनाही या हवामानाचा चांगला फटका बसला  होता.

सचिन तेंडुलकरची उपस्थिती

विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने पाहण्यासाठी भारताचा माजी कसोटीवीर सचिन तेंडुलकरने आपली उपस्थिती दर्शविली होती. लॉर्डस्ची तिसरी कसोटी पाहण्यासाठीही तो इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. लॉर्डस्च्या एमसीसीच्या क्रिकेट म्यूझीयममध्ये सचिन तेंडुलकरच्या तैलचित्राचा समावेश करुन त्याचा गौरव करण्यात आला होता. विम्बल्डन स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या सचिन तेंडुलकरचे स्विसचा माजी टेनिसपटू रॉजर फेडरर आणि बिजॉन बोर्ग यांच्या बरोबरचे छायाचित्र प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आले.

Advertisement

.