अल्कारेझ, साबालेंका सेमीफायनलमध्ये
सलग तिसऱ्यांदा अल्कारेझची उपांत्य फेरीत धडक तर साबालेंकाचा विजयासाठी संघर्ष
वृत्तसंस्था/ लंडन
नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन 2025 च्या प्री-क्वार्टरफायनल सामन्यात अॅलेक्स डी मिनोरला हरवून क्वार्टरफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. त्यानंतर, स्पेनचा युवा खेळाडू कार्लोस अल्कारेझने देखील दमदार खेळ साकारताना ब्रिटनच्या कॅमेरॉन नॉरीला सरळ सेटमध्ये हरवून सेमीफायनलचे तिकीट मिळवले आहे. याशिवाय, महिला एकेरीत मात्र वर्ल्ड नं 1 बेलारुसच्या आर्यना साबालेंकाला मात्र विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. तब्बल तीन तासाहून अधिक चाललेल्या लढतीनंतर साबालेंकाने उपांत्य फेरी गाठली आहे.
कार्लोस अल्कारेझ आणि ब्रिटनचा कॅमेरॉन नॉरी यांच्यातील हा टेनिस सामना एकूण 3 तास खेळला गेला. परंतु संपूर्ण सामन्यात शानदार खेळाचे प्रदर्शन साकारताना कार्लोसने प्रतिस्पर्ध्यावर आपला दबदबा कायम राखला. अल्कारेझने पहिला सेट 6-2 असा जिंकला. त्यानंतर, पुढील दोन सेटमध्ये, त्याने नॉरीचा 6-3 आणि 6-3 असा पराभव करुन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. सेमीफायनलमध्ये अल्काराज अमेरिकन खेळाडू टेलर फ्रिट्झसोबत भिडणार आहे. आता, उपांत्य फेरीत त्याचा सामना अमेरिकन खेळाडू टेलर फ्रिट्झसोबत होणार आहे. विशेष म्हणजे, अल्कारेझने यापूर्वी 2023 आणि 2024 मध्ये विम्बल्डन पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. या दरम्यान, त्याने स्टार खेळाडू नोवाक जोकोविचलाही पराभूत केले होते. आता, सलग तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याचा अल्कारेझचा प्रयत्न असेल.
अमेरिकेचा फ्रिट्झ पहिल्यादांच उपांत्य फेरीत
अमेरिकेचा युवा खेळाडू आणि युएस ओपन उपजेता फ्रिटझ टेलरने बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात रशियाच्या करेन खाचनोवला 6-3, 6-4, 1-6,7-6 असे नमवत सेमीफायनल गाठली आहे. सामन्यादरम्यान टेलरला दुखापतीमुळे काही काळ विश्रांती घ्यावी लागली, पण याचा आपल्या खेळावर परिणाम न होऊ देता फ्रिट्झने शानदार खेळ साकारला विजय मिळवला.
महिला एकेरीत साबालेंकाही सेमीफायनलमध्ये
बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात साबालेंकाने जर्मनीच्या लॉरा सिगमंडचा 4-6, 6-2, 6-4 असा पराभव केला. तीन तासाहून अधिक काळ चाललेल्या लढतीत सिगमंडने साबालेंकाला जोरदार टक्कर दिली. पण, अनुभवाच्या जोरावर साबालेंकाने सिगमंडचे कडवे आव्हान मोडून काढताना तिसऱ्यांदा विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी तिने 2021 आणि 2023 मध्ये सेमीफायनल गाठली होती. आता तिचा सामना अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवाशी होणार आहे.
दुसरीकडे, अमेरिकेच्या अनिसिमोवाने रशियाच्या अनास्तासियाला 6-1, 7-6, असे नमवत प्रथमच विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. रोमांचक झालेल्या या लढतीत अमेरिकन खेळाडूने शानदार खेळ साकारला.