अल्कारेझ, साबालेंका, बेनसिक,किज उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/कॅलिफोर्निया
इंडियन वेल्स मास्टर्स 1000 दर्जाच्या येथे सुरू असलेल्या आंतराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या माजी टॉपसिडेड कार्लोस अल्कारेझ, अमेरिकेच्या बेन शेल्टन, महिलांच्या विभागात स्वीसच्या बेलिंडा बेनसिक, टॉपसिडेड आर्यना साबालेंका यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पेनच्या माजी टॉपसिडेड तसेच सध्या एटीपीच्या मानांकनात तिसऱ्या स्थानावर असलेल्या अल्कारेझने बल्गेरीयाच्या ग्रिगोर डिमीट्रोव्हचे आव्हान 6-1, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणले. अल्कारेझने ही स्पर्धा यापूर्वीच दोनवेळा जिंकली आहे. तर अल्कारेझने एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेत एकेरीतील आपला 50 वा विजय नोंदविला आहे. यापूर्वी स्वीसचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा जोकोविच यांनी या स्पर्धेचे अजिंक्यपद सलग तीनवेळा मिळविण्याचा पराक्रम केला आहे.
या सामन्यात अल्कारेझने दोन्ही सेट्मध्ये प्रत्येकी दोनवेळा डिमीट्रोची सर्व्हिस भेदली. शेवटी या सामन्यात फोरहॅन्ड फटक्यावर आपला विजय नोंदविला. चौथ्याफेरीतील अन्य एका सामन्यात अर्जेंटिनाच्या सेरुनडोलोने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी. मिनॉरचा 7-5, 6-3 अशा सरळ सेट्मध्ये पराभव केला. अल्कारेझ आणि सेरुनडोलो यांच्यात उपांत्यपूर्व फेरीतील लढत होईल. अमेरिकेच्या बेन शेल्टनने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना आपल्याच देशाच्या ब्रेन्डॉन नाकाशिमाचा 7-6 (8-6), 6-1 असा पराभव केला. ब्रिटनच्या ड्रेपरने अमेरिकेच्या टेलर फ्रित्झचा 7-5, 6-4 असा पराभव करत पहिल्यांदाच या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. आता ड्रेपर आणि शेल्टन यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या युकी भांबरीचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. स्मिथ आणि रोमोबोली या जोडीने भांबरी आणि गोरानसेन यांचा 7-6 (7-5), 3-6, 10-8 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
महिलांच्या विभागात स्वीसच्या बेलिंडा बेनसिकने अमेरिकेच्या तृतिय मानांकित कोको गॉफला चौथ्याफेरीतच पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. आता बेनसिक आणि ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम विजेती मॅडीसन किज यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. बेनसिकने कोको गॉफचा 3-6, 6-3, 6-4 अशा सेट्मध्ये पराभव केला. गेल्या महिन्यात बेनसिकने अबुधाबीतील टेनिस स्पर्धा जिंकली होती. महिला एकेरीच्या दुसऱ्या एका सामन्यात अमेरिकेच्या मॅडीसन किजने क्रोएशीयाच्या डोना व्हेकीकचा 4-6, 7-6 (9-7), 6-3 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. बेलारुसच्या टॉपसिडेड आर्यना साबालेंकाने ब्रिटनच्या कार्टलचा 6-1, 6-2 अशा सरळ सेट्मध्ये फडशा पाडत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.