अल्कारेझ, साबालेंका पुढील फेरीत दाखल
वृत्तसंस्था / लंडन
2025 च्या विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने तसेच आर्यना साबालेंका यांनी एकेरीतील आपले सामने जिंकून पुढील प्रवेश केला. ब्रिटनच्या इमा राडुकेनु तसेच जर्मनीच्या स्ट्रफचे आव्हान संपुष्टात आले. भारताच्या एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा मेक्सीकन साथीदार व्हॅरेला यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान दुसऱ्या फेरीत समाप्त झाले.
या स्पर्धेतील विद्यमान विजेता अल्कारेझने एकेरीतील सलग 21 सामने जिंकण्याची आपली घोडदौड कायम राखली आहे. अल्कारेझने विम्बल्डन स्पर्धेत यापूर्वी आपल्या दर्जेदार खेळाचे दर्शन सलग दोन वर्षे घडवित आहे. आता तो ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात अल्कारेझने जर्मनीच्या स्ट्रफचा 6-1, 3-6, 6-3, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. मात्र स्ट्रफने अल्कारेझला विजयासाठी चार सेट्सपर्यंत झुंजविले. अल्कारेझचा पुढील फेरीतील सामना रशियाच्या रुबलेव्हशी होणार आहे. रशियाच्या रुबलेव्हने फ्रान्सच्या मॅनेरिनोचा 7-5, 6-2, 6-3 असा फडशा पाडत पुढील फेरीत स्थान मिळविले. रुबलेव्हने गेल्या वर्षी विम्बल्डन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. 2025 च्या टेनिस हंगामात अल्कारेझने फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा तसेच एटीपी टूरवरील मास्टर्स 1000 दर्जाच्या मॉटेकार्लो आणि रोममधील दोन स्पर्धा जिंकल्या असून अलिकडेच त्याने क्विन्स क्लब टेनिस स्पर्धाही जिंकली होती. अल्कारेझला मात्र बार्सिलोना टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. विम्बल्डन स्पर्धेमध्ये अल्कारेझने सलग 17 एकेरी सामने जिंकले असून आता तो या स्पर्धेत जेतेपदाची हॅट्ट्रीक करण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत चार टेनिसपटूंनी विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा सलग तीनवेळा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
बेलारुसची टॉपसिडेड आर्यना साबालेंकाने ब्रिटनच्या इमा राडुकेनुचा सरळ सेट्समध्ये पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. शनिवारी महिला एकेरीच्या सामन्यात साबालेंकाने राडुकेनुचा 7-6 (8-6), 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. साबालेंकाने आतापर्यंत तीन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या लढतीमध्ये 22 वर्षीय राडुकेनुने साबालेंकाला या लढतीत पहिला सेट टायब्रेकरपर्यंत लांबवत चांगलेच झुंजविले. साबालेंकाला हा सामना जिंकण्यासाठी चांगलेच झगडावे लागले.
पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या एन. श्रीराम बालाजी आणि मेक्सीकोचा व्हॅरेला यांचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. चौथ्या मानांकीत स्पेनचा मार्सेलो ग्रेनोलर्स आणि अर्जेंटिनाचा झेबालोस यांनी बालाजी व व्हॅरेला यांचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. हा सामना 80 मिनिटे चालला होता.