नौमन अली, मेली केर सर्वोत्तम क्रिकेटपटू
वृत्तसंस्था / दुबई
पाकिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज नौमन अली तसेच न्यूझीलंडची महिला अष्टपैलु क्रिकेटपटू मेली केर यांची आयसीसीतर्फे ऑक्टोबर महिन्यातील अनुक्रमे सर्वोत्तम पुरूष आणि महिला क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली.
अलिकडेच इंग्लंड विरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकचा फिरकी गोलंदाज नौमन अलीची कामगिरी अप्रतिम झाली. नौमन अलीच्या कामगिरीच्या जोरावर पाकने घरच्या भूमीवर इंग्लंडचा कसोटी मालिकेत पराभव केला. या मालिकेतील दोन सामन्यांत नौमन अलीने एकूण 277 धावांत 20 बळी घेतले. पाकने घरच्या मैदानावर तब्बल तीन वर्षांनंतर पहिलीच कसोटी मालिका जिंकली. ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूच्या शर्यतीमध्ये नौमन अली, द. आफ्रिकेचा रबाडा आणि न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज मिचेल सॅन्टेनर यांच्यात चुरस निर्माण झाली होती. पण नौमन अलीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून हा पुरस्कार पटकाविला.
महिलांच्या क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या अष्टपैलु मेली केरची ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून आयसीसीने घोषणा केली आहे. न्यूझीलंडच्या महिला संघाने भारताच्या दौऱ्यावर दर्जेदार कामगिरी केली. या दौऱ्यामध्ये मेली केरने आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. भारता विरुद्धच्या मालिकेत केरची अंतिम सामन्यात ‘सामनावीर’ तसेच ‘मालिकावीर’ म्हणून निवड करण्यात आली होती. मेली केरने आयसीसीचा हा पुरस्कार दुसऱ्यांदा पटकाविला आहे. 2022 च्या फेब्रुवारीमध्ये तिने हा पुरस्कार पहिल्यांदा मिळविला होता. भारता विरुद्धच्या मालिकेत 24 वर्षीय मेली केरने 15 गडी बाद केले. तसेच फलंदाजीत तिने 135 धावा जमविल्या. ऑक्टोबर महिन्यामध्ये तिने 7 सामन्यात फलंदाजीत 160 धावा तर गोलंदाजीत 19 बळी मिळविले.