अल्कारेझ, गॉफ, साबलेंका चौथ्या फेरीत
इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस : शेपोव्हॅलोव्ह, सॅकेरी पराभूत
वृत्तसंस्था / इंडियन वेल्स
2025 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या इंडियन्स वेल्स मास्टर्स पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात स्पेनचा कार्लोस अल्कारेझ तर महिलांच्या विभागात साबलेंका, गॉफ, मॅडिसन किज यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला. दरम्यान कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्ह, ग्रीकच्या मारिया सॅकेरी, इटलीच्या ब्रोंझेटी, बेल्जीयमची मर्टन्स यांचे आव्हान संपुष्टात आले.
पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील झालेल्या सामन्यात स्पेनच्या अल्कारेझने कॅनडाच्या डेनिस शेपोव्हॅलोव्हचा 6-2, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. या लढतीत द्वितीय मानांकीत अल्कारेझने सलग पाच गेम्स पहिल्या सेटमध्ये जिंकले. हा सामना दीड तास चालला होता. आता डिमीट्रोव्ह आणि फ्रान्सच्या मोनफिल्स यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर अल्कारेझचा चौथ्या फेरीतील सामना होईल. या स्पर्धेत सर्बियाच्या माझी टॉपसिडेड जोकोविचचे आव्हान दुसऱ्या फेरीतच समाप्त झाले. अमेरिकेच्या टेलर फ्रिझने चिलीच्या टॅबेलोचा 4-6, 6-3, 6-1 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. फ्रिजचा पुढील फेरीतील सामना ब्रिटनच्या ड्रेपरशी होणार आहे. ब्रिटनच्या ड्रेपरने अमेरिकेच्या ब्रुक्सबायचा सरळ सेटमध्ये पराभव करुन चौथी फेरी गाठली आहे. बेन शेल्टनने कॅरेन कॅचेनोव्हचे आव्हान 6-3, 7-5 असे संपुष्टात आणत चौथी फेरी गाठली. या लढतीत शेल्टनने 8 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. शेल्टनचा पुढील फेरीतील सामना नेकाशिमाशी होणार आहे.महिलांच्या विभागात बेलारुसच्या टॉपसिडेड साबालेंकाने इटलीच्या लुसीया ब्रोंझेटीचा 6-1, 6-2 अशा सेटमध्ये फडशा पाडत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. साबालेंकाला यापूर्वी झालेल्या कतार खुल्या आणि दुबई टेनिस स्पर्धेत सुरुवातीच्या फेरीमध्ये पराभव पत्करावा लागला होता. साबालेंकाचा पुढील फेरीतील सामना ब्रिटनच्या कार्टेलशी होणार आहे. अमेरिकेच्या कोको गॉफ तसेच मॅडीसन किज यांनीही प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवित चौथी फेरी गाठली.
अमेरिकेच्या तृतिय मानांकित कोको गॉफने ग्रीकच्या मारिया सॅकेरीचा 7-6 (7-1), 6-2 असा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले. आता गॉफचा चौथ्या फेरीतील सामना स्वीसच्या बेनसिकशी होणार आहे. यापूर्वी दोनवेळा बेनसिकने गॉफचा पराभव केला होता. अमेरिकेच्या मॅडीसन किजने बेल्जीयमच्या इलेसी मर्टन्सचा 6-2, 6-7 (6-8), 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. मॅडिसन किजचा अलिकडच्या कालावधीतील एकेरीतील हा सलग 14 वा विजय आहे. यापूर्वी दोनवेळा झालेल्या सामन्यात मर्टन्सने किजवर विजय मिळविला होता. चौथ्या फेरीत किजचे लढत क्रोशिएच्या व्हेकीकशी होणार आहे.