अल्कारेझ, फ्रिट्झ, साबालेन्का, उपांत्यपूर्व फेरीत
नोरी, सीगमंड, पावल्युचेन्कोव्हा, अॅनिसिमोव्हा यांचीही आगेकूच, रुबलेव्ह, मर्टेन्स पराभूत
वृत्तसंस्था/ लंडन
स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, अमेरिकेचा टेलर फ्रिट्झ, कॅमेरॉन नोरी, अग्रमानांकित आर्यना साबालेन्का, लॉरा सीगमंड, अॅनास्तेशिया पावलुचेन्कोव्हा, अमांदा अॅनिसिमोव्हा यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली तर आंद्रे रुबलेव्ह , एलिस मर्टेन्स यांचे आव्हान चौथ्या फेरीत समाप्त झाले.
पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात कार्लोस अल्कारेझने सलग 18 वा विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने 14 व्या मानांकित आंद्रे रुबलेव्हाचा 6-7 (5-7), 6-3, 6-4, 6-4 असा पराभव केला. अल्कारेझने दोन वेळा ही स्पर्धा जिंकली असून सलग तिसऱ्यांदा त्याने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याची पुढील लढत कॅमेरॉन नोरीशी होईल. नोरीने पाच सेट्सच्या झुंजीत पात्रता फेरीतून आलेल्या निकोलस जॅरीचा 6-3, 7-6 (7-4), 6-7 (7-9), 6-7 (5-7), 6-3 असा पराभव केला. अल्कारेझने आधीच्या फेरीत जर्मनीच्या जॅन लेनार्डचा चार सेट्समध्ये पराभव करून चौथी फेरी गाठली होती. अमेरिकेच्या पाचव्या मानांकित टेलर फ्रिट्झने तिसऱ्यांदा विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून त्याला जॉर्डन थॉम्पसनने दुसऱ्या सेटमध्ये दुखापतीमुळे माघार घेतल्याने पुढे चाल मिळाली. त्यावेळी फ्रिट्झ 6-1, 3-0 असा पुढे होता. त्याची पुढील लढत रशियाच्या कॅरेन खचानोव्हशी होईल.
सीगमंड, पावल्युचेन्कोव्हाची आगेकूच
बेलारुसच्या आर्यना साबालेन्काने सलग 11 व्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठताना 24 व्या मानांकित एलिस मर्टेन्सचा 6-4, 7-6 (7-4) असा पराभव केला. बारापैकी दहाव्यांदा तिने मर्टेन्सला हरविले आहे. जर्मनीची 37 वर्षीय लॉरा सीगमंडशी तिची पुढील लढत होईल. सीगमंडने आधीच्या फेरीत मॅडिसन कीजला पराभवाचा धक्का दिला होता. यावेळी तिने सोलाना सिएराचा 6-3, 6-2 असा पराभव केला. रशियाच्या अॅनास्तेशिया पावल्युचेन्कोव्हाने सोने कार्टवर 7-6 (7-3), 6-4 अशी मात केली. या स्पर्धेत 9 वर्षांनंतर तिने प्रथमच शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. 13 व्या मानांकित अमांदा अॅनिसिमोव्हाशी तिची पुढील लढत होईल. अॅनिसिमोव्हाने 30 व्या मानांकित झेकच्या लिंडा नोस्कोव्हाचा 6-2, 5-7, 6-4 असा पराभव केला.