अल्कारेझचे लक्ष सलग तिसऱ्या जेतेपदावर
विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा सोमवारपासून
वृत्तसंस्था / लंडन
2025 च्या टेनिस हंगामातील येथे सोमवारपासून प्रतिष्ठेची समजली जाणारी विम्बल्डन ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेतील पुरुष आणि महिला एकेरीचा ड्रॉ शुक्रवारी काढण्यात आला. या स्पर्धेतील पुरुष एकेरीतील विद्यमान विजेता स्पेनचा कार्लोस अल्कारेझ आता सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. महिलांच्या एकेरीत झेकच्या बार्बोरा क्रेझीकोव्हाने गेल्या वर्षी या स्पर्धेत जेतेपद पटकाविताना इटलीच्या पाओलिनीचा पराभव केला होता.
पुरुष एकेरीच्या काढण्यात आलेल्या ड्रॉनुसार विद्यमान विजेता अल्कारेझचा सलामीचा सामना फॅबीओ फॉगनेनीशी होणार आहे. 38 वर्षीय फॉगनेनीने यापूर्वी विम्बल्डन स्पर्धेत 14 वेळा आपला सहभाग दर्शविला होता. पण त्याला एकदाही तिसरी फेरी पार करता आलेली नाही. फॉगनेनीने 2015 साली अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणारी फ्लेव्हीया पिनेटाशी विवाह केला होता. स्पेनच्या अल्कारेझने अलिकडच्या कालावधीत सलग 18 एकेरी सामने जिंकले असून तो आपली विजय घोडदौड विम्बल्डनमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. इटलीचा टॉपसिडेड जेनिक सिनेरचा सलामीचा सामना मुसेटी बरोबर तर ऑस्ट्रेलियाच्या ड्रेपरचा सलामीचा सामना सर्बियाच्या माजी टॉपसिडेड जोकोविचबरोबर होणार आहे. जोकोविचने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत आतापर्यंत 7 वेळा विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या मानांकनात सिनेरला पहिले तर अल्कारेझला दुसरे, जर्मनीच्या व्हेरेव्हला तिसरे स्थान, ड्रेपरला चौथे, अमेरिकेच्या टेलर फ्रित्झला पाचवे स्थान मिळाले आहे.
महिलांच्या विभागात काढण्यात आलेल्या ड्रॉनुसार साबालेंका-मॅडिसन किज, पावोलिनी-क्विनवेन, कोको गॉफ-स्वायटेक, रायबाकिना-पेगुला यांच्यात उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होतील, असा अंदाज आहे. अमेरिकेच्या कोको गॉफने मे महिन्यात फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली असून आता ती तिसरे ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. गॉफचा सलामीचा सामना डायना यास्ट्रेमेस्काशी होणार आहे. गॉफला कदाचित दुसऱ्या फेरीत बेलारुसच्या अझारेंकाशी लढत द्यावी लागेल. दोन वर्षांपूर्वी या स्पर्धेत सोफी किनेनने गॉफला पहिल्याच फेरीत पराभूत केले होते. आतापर्यंत तीन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या साबालेंकाचा सलामीचा सामना कॅनडाच्या ब्रेनस्टाईन बरोबर होणार आहे. या स्पर्धेतील महिला एकेरीतील विद्यमान विजेती बार्बोरा क्रेझीकोव्हाचा सलामीचा सामना इलाशी होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारी इला ही फिलीपिन्सची पहिली टेनिसपटू आहे. झेकची पेत्रा क्विटोव्हाने अलिकडेच आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. क्विटोव्हाचा या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामना नेव्हारोशी होणार आहे. क्विटोव्हाने 2011 आणि 2014 साली विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती.