अल्कारेझ अंतिम फेरीत दाखल
वृत्तसंस्था / बिजिंग (चीन)
एटीपी आणि डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने रशियाच्या मेदव्हेदेवचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. दरम्यान महिलांच्या विभागात साबालेंकाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.
पुरुष एकेरीच्या मंगळवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तृतिय मानांकित अल्कारेझने डॅनिल मेदव्हेदेवचा 7-5, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता इटलीचा जेनिक सिनेर आणि चीनचा युनचाओकिटी यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर अल्कारेझचा अंतिम सामना खेळविला जाईल.
महिलांच्या विभागात एरिना साबालेंकाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना व्रुगेरचा 6-2, 6-2 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. साबालेंकाचा अलिकडच्या कालावधीतील हा एकेरीतील सलग 14 वा विजय आहे. साबालेंकाने चालू वर्षीच्या जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. साबालेंकाचा पुढील फेरीचा सामना अमेरिकेच्या मॅडीसन किजबरोबर होणार आहे. मॅडीसन किजने ब्राझीलच्या बिट्रेसी हदाद माइयाचा 6-3, 6-3 असा पराभव केला. जपानच्या नाओमी ओसाकाने केटी व्हॉलीनेटस्वर 6-3, 6-2 अशी मात केली. अमेरिकेच्या जेसीका पेगुलाला अनपेक्षित पराभवाचा धक्का सहन करावा लागला. चौथ्या फेरीतील सामन्यात पाओला बेडोसाने पेगुलाचा 6-4, 6-0 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.