For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्कारेझ, सिनर, ओसाकाची विजयी सलामी

06:58 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
अल्कारेझ  सिनर  ओसाकाची विजयी सलामी
Advertisement

अँडी मरे पराभूत, रुबलेव्ह, हुरकेझ, ओस्टापेंको विजयी

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

येथील रोलाँ गॅरो रेड क्लेकोर्टवर सुरु झालेल्या 2024 च्या टेनिस हंगामातील दुसऱ्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, इटलीचा यानिक सिनर, रशियाचा रुबलेव्ह, हुरकेझ आणि स्विसचा वावरिंका यांनी विजयी सलामी दिली. मात्र ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. महिलांच्या विभागात जपानची माजी विजेती नाओमी ओसाका, एलेना ओस्टापेंको यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह, इटलीचा सोनेगो यांनी आपले पहिल्या फेरीतील विजय नोंदविले. फ्रान्सच्या हंबर्टचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

Advertisement

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात स्पेनचा तृतीय मानांकित कार्लोस अल्कारेझने वुल्फवर 6-1, 6-2, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. अल्कारेझच्या उजव्या हाताच्या तळव्याला झालेली दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने त्याला या सामन्यात या दुखापतीची समस्या अधिक वाटत होती. या दुखापतीमुळे अल्कारेझने एटीपी टूरवरील झालेल्या गेल्या तीन स्पर्धांमध्ये आपला सहभाग दर्शविला नव्हता. रशियाचा सहावा मानांकित तसेच माद्रिद स्पर्धेतील विजेता आंद्रे रुबलेव्हने जपानच्या टेरो डॅनियलवर 6-2, 6-7 (3-7), 6-3, 7-5 असा विजय मिळविला. त्याचप्रमाणे अन्य एका सामन्यात हुरकेझने जपानच्या शिनातेरो मोचीझुकीचा 4-6, 6-3, 3-6, 6-0, 6-3 अशा पाच सेट्समधील लढतीत पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.  काही कालावधीमध्ये पाऊस झाल्याने या सामन्याला उशिरा सुरुवात करण्यात आली होती. इटलीच्या द्वितीय मानांकित यानिक सिनरने ख्रिस्टोफर युबँक्सचा 6-3, 6-3, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात सिनेरने 32 विजयी फटक्याची नोंद केली. तर त्याने पाच वेळा अमेरिकेच्या युबँक्सची सर्व्हिस भेदली. आता सिनेरचा दुसऱ्या फेरीतील सामना फ्रान्सच्या अनुभवी रिचर्ड गॅसकेटशी होणार आहे. गेल्या मार्चमध्ये मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकल्यानंतर सिनेरची ही तिसरी स्पर्धा आहे. माँटेकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत सिनेरला उपांत्य फेरीत सित्सिपसकडून पराभव पत्करावा लागला होता. बल्गेरियाच्या 10 व्या मानांकित ग्रिगोर डिमिट्रोव्हने अॅलेक्सझांडेर कोव्हासेव्हिकचा 6-4, 6-3, 6-4 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात इटलीच्या लोरेंझो सोनेगोने फ्रान्सच्या 17 व्या मानांकित युगो हंबर्टचे आव्हान 6-4, 2-6, 6-4, 6-3 असे संपुष्टात आणले. स्विसच्या स्टॅनिसलास वावरिंकाने ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेचा पहिल्याच फेरीत 6-4, 6-4, 6-2 असा पराभव करत विजयी सलामी दिली. अँडी मरेची ही शेवटची टेनिस स्पर्धा आहे.

महिलांच्या विभागात जपानची माजी विजेती नाओमी ओसाकाने इटलीच्या लुसिया ब्रोंझेटीवर 6-1, 4-6, 7-5 असा विजय मिळवत विजयी सलामी दिली. आता ओसाकाचा दुसऱ्या फेरीतील सामना पोलंडची टॉप सिडेड आणि या स्पर्धेतील विद्यमान विजेती इगा स्वायटेकशी होणार आहे. पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात एलेना ओस्टापेंकोने रुमानियाच्या जॅक्वेलिनी ख्रिस्टेनचा 6-4, 7-5 तसेच व्हिक्टोरिया गोलुबिकने बार्बोरा क्रेसिकोव्हाचा 7-6 (7-3), 6-4 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. 2021 साली या स्पर्धेत बार्बोरा क्रेसिकोव्हाने विजेतेपद पटकाविले होते.

Advertisement
Tags :

.