नीतू डेव्हिडसह अॅलिस्टर कूक, डिव्हिलियर्स ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये
वृत्तसंस्था/ दुबई
भारताच्या माजी फिरकीपटू नीतू डेव्हिड या बुधवारी आयसीसी हॉल ऑफ फेममध्य समावेश होणाऱ्या देशातील दुसरी महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत. महिला खेळाडूंमध्ये कसोटी डावात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम (53 धावांत 8 बळी) अजूनही त्यांच्याच नावावर आहे. डेव्हिडसोबत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू ए. बी. डिव्हिलियर्स आणि इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक यांचाही ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे.
माजी कर्णधार डायना एडलजीच्या समावेशानंतर एक वर्षाने डेव्हिड यांनी आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये प्रवेश केला आहे. सध्या भारतीय महिला संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षा म्हणून त्या जबाबदारी पेलत आहेत. त्या उत्कृष्ट डावखुऱ्या फिरकीपटू राहून भारतासाठी 100 हून अधिक सामने (10 कसोटी आणि 97 एकदिवसीय सामने) खेळल्या. सध्या 47 वर्षांच्या असलेल्या डेव्हिड या 141 बळींसह भारतातर्फे एकदिवसीय क्रिकेटमध्ये बळी मिळविण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एकदिवसीय सामन्यांत 100 बळी घेणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला खेळाडू देखील ठरल्या होत्या.
त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमध्ये 2005 मधील विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजांच्या यादीत मिळविलेले अव्वल स्थान आणि त्याद्वारे प्रथमच अंतिम फेरी गाठण्याच्या दृष्टीने केलेली मोलाची मदत यांचा समावेश होतो. डेव्हिड यांनी ‘आयसीसी’च्या एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट होणे हा खरोखरच सन्मान आहे, राष्ट्रीय संघाची जर्सी परिधान करणाऱ्या खेळाडूस मिळालेली ही मी सर्वोच्च मान्यता मानते’.
उत्तर प्रदेशतर्फे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळलेल्या डेव्हिड 1995 च्या उत्तरार्धात जमशेदपूर येथे इंग्लंडविरुद्ध 53 धावांत 8 बळी अशी सनसनाटी कामगिरी केल्याने खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाल्या होत्या. डेव्हिड यांनी 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि दोन वर्षांनंतर आशिया चषक व भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर एकदिवसीय सामने खेळण्यासाठी तो निर्णय मागे घेतला होता. त्या 2013 मध्ये देशांतर्गत शेवटचा सामना खेळल्या.
अॅलिस्टर कूकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 पेक्षा जास्त वेळा इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले असून इंग्लंडचा सर्वाधिक कसोटी धावा करणारा आणि शतके झळकावणारा खेळाडू बनून त्याने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने स्वगृही फलंदाज आणि कर्णधार म्हणून उल्लेखनीय यश मिळवले. तर डिव्हिलियर्सने आपल्या 14 वर्षांच्या कारकिर्दीत तिन्ही प्रकारांत मिळून 20 हजारांहून हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या. ‘मिस्टर 360 डिग्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत वेगवान अर्धशतक, शतक आणि 150 धावा करण्याचे विक्रम रचले.