कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Akshaya Tritiya 2025: ऋतुचक्रातील दुसरा सण, अक्षय तृतीयेचे महत्व काय?

03:46 PM Apr 24, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

अक्षय तृतीयेला केलेला दानधर्म अखंड होतो, म्हणून या निमित्ताने दाम्पत्य भोजन घालण्याची देखील पद्धत आहे

Advertisement

By : प्रसन्ना मालेकर

Advertisement

कोल्हापूर : अक्षय तृतीया हा ऋतुचक्राचा दुसरा सण असला तरी सणांच्या चक्राला मात्र येथे विराम मिळतो. बोली भाषेत हा सण आख्खी तीज म्हणून ओळखला जातो. आखिती तीज म्हणजे अक्षय तृतीया या शब्दाचा अपभ्रंश आहे. ज्येष्ठातल्या बेंदरापासून सुरु झालेले सणवार अक्षय तृतीयेला थांबतात. त्याचं कारण म्हणजे शेतीच्या चक्रामध्ये घाईचे दिवस सुरू होतात. शेतीची मशागत, नांगरणी अशा कष्टाच्या कामांमध्ये सणवार साजरी करायला उसंत कुठली? त्यामुळे कदाचित पुढची दीड दोन महिने काळ्या आईची सेवा करण्याचे दिवस ठरले जातात.

अक्षय तृतीया या दिवशी मुहूर्तापूर्ती का असेना पेरणी करण्याचा प्रघात आहे. ही पेरणी अर्थातच शेतात नसते, गाव गावच्या आया-बायांनी जपलेली बी-बियाणे या निमित्ताने परसात अंगणात टोकणले जातात. अक्षय तृतीयेला केलेलं कुठलंही काम अखंड होतं, अशी समजूत आहे. त्यामुळे शेतीच्या कामाला यश मिळावं आणि हे बी-बियाण्याचं धन अखंड टिकाव, म्हणून गावोगावच्या आया - बहिणींनी केलेली ही प्रार्थन असते. अक्षय तृतीया हा खरेदीचा मुहूर्त मानून बाजारपेठेत गर्दी करणे, सोनं नाण्याची खरेदी करणे, हा गेल्या काही वर्षातला बाजाराने रुजवलेला प्रघात आहे.

जुन्या पद्धतीप्रमाणे अक्षय तृतीयेला नव्या कऱ्यांची खरेदी करतात. त्यातला बेंबी असलेला करा पितरांचा, बेंबी नसलेला करा देवांचा मानून त्याच्यावर वडाच्या पानाची पत्रावळ ठेवली जाते. पूरणपोळी आणि उन्हाळ्याच्या निमित्ताने केलेले वाळवण तळून पूर्ण नैवेद्य वाढून घाटांवर ठेवला जातो. शास्त्रात दिलेल्या उदकुंभ दान या विधीचा हा भाग आहे. अक्षय तृतीयेला केलेला दानधर्म अखंड होतो, म्हणून काही ठिकाणी या निमित्ताने दाम्पत्य भोजन घालण्याची देखील पद्धत आहे.

काही गावात अक्षय तृतीयेला पाडव्याप्रमाणे इजंगाजं म्हणजे वीज, पाऊस, ढग यांच्या नावाने गुळ, पुरणपोळी एकत्र करुन नैवेद्य दाखवला जातो. ‘इजंगाजंच्या नावाने शेरनी घ्या’ असं म्हटले जाते. वळवाचा पाऊस आणि त्या निमित्ताने निसर्गाचे रौद्ररुप या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून असे साधे सोहळे करणारी आपली संस्कृती आहे. लग्नसराई आणि बाकी उत्सव सोहळे सुरू राहिले तरी आता बेंदरापर्यंत मोठा सण नसल्याने अक्षय तृतीयेचा सोहळा दिमाखात साजरा होतो.

अक्षय तृतीया, पितर आणि देव यांची तिथी मानली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी चैत्रगौरीच्या उत्सवाची सांगता होते, त्यामुळे ज्या घरांमध्ये चैत्र गौरी बसते, अशा घरात कैरीची पन्हं, डाळ याचा नैवेद्य दाखवून हळदीकुंकू आयोजित केले जाते. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देवीचा दोलोत्सव होतो. गावोगावी ग्रामदेवतांना आमरस, पुरणपोळी असा नैवेद्य अर्पण होतो. नवीन आलेला आंबा याच दिवसापासून उपयोगात येतो.

Advertisement
Tags :
@kolhapur#Farming#mango#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaAkshaya TritiyaAkshaya Tritiya 2025
Next Article