कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘अक्षरधारा’ कार्यक्रमाने मिळविली रसिकांची दाद

12:48 PM Jun 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त कार्यक्रम : प्रेक्षकांना मनसोक्त हसवून केले अंतर्मुख : लोकमान्य रंगमंदिरात आयोजन

Advertisement

बेळगाव : लेखक आणि कवींनी आपल्या शब्दसंपदेने मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. हा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणारा आणि साहित्यिकांच्या साहित्याचा नेमका आढावा घेणारा ‘अक्षरधारा’ या कार्यक्रमाने रसिकांची दाद मिळविली. लोकमान्य रंगमंदिर येथे सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त अभिजात मराठी संस्थेच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात अभिनेते संजय मोने, आस्ताद काळे, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा सहभाग होता. संकल्पना आणि सूत्रसंचालन उत्तरा मोने यांचे होते.

Advertisement

कार्यक्रमाची सुरुवात पु. ल. देशपांडे यांच्या ‘बिगरी ते मॅट्रिक व मी ब्रह्मचारी असतो तर’ या दोन ललितलेखांनी झाली. पु. लं. ची खुसखुशीत व मिश्किल शैली संजन मोने यांनी नेमकी पकडली. त्यातही शाळेतील मास्तरांचे वर्णन अगदी चपखल असे. पु. ल. व सुनीताबाई यांच्या संवादावर आधारित ‘त्यांचे आहे त्यांच्या पाशी’ याचे सादरीकरण संजय मोने व ऐश्वर्या नारकर यांनी केले. व. पु. काळे लिखित ‘एक सिंगल चहा’ यातील नात्यांचे अंतरग उलगडताना आस्ताद काळे यांनी आपल्या सादरीकरणाने त्यातील भावभावना प्रेक्षकांपर्यंत नेमक्या पोहोचवल्या.

शांता शेळके व लता मंगेशकर यांच्यातील स्नेहभाव, जयवंत दळवी यांचे ‘सारे प्रवासी घडीचे’ यातील नाट्या चर्चा, विद्याधर पुंडलिक यांची ‘सती’ ही कथा, चिं. वि. जोशी यांच्या ‘नवलाईचे देव’ या ललित लेखांचे सादरीकरण कलाकारांनी प्रभावीपणे केले. कुसुमाग्रज यांची ‘राजहंस माझा निजला’, ‘कणा’, ‘गाभारा’, ‘रिटायर परमेश्वर’, ‘साठीचा गजर’, ‘झपताल’, ‘आतले बाहेरचे’, पाडगावकर यांची कविता ‘सिंधूचा बाप’ हे अत्रे लिखित विडंबन, या सर्व सादरीकरणांनी प्रेक्षकांना मनसोक्त हसवता हसवता अंतर्मुख केले. इंदिरा संत यांची ‘कृष्ण’ आणि पद्मा गोळे यांची ‘मी घरात आले’, शांता शेळके यांची ‘पैठणी’ या कविता ऐश्वर्या नारकर यांनी सादर केल्या. सर्व लेखकांच्या साहित्यातून माणूसपणाचे महत्त्वच अधोरेखित होते. याच माणूसपणावरची सुधीर मोघे यांची कविता आस्ताद काळे यांनी सादर केली व कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रारंभी सर्व कलाकार तसेच वाचनालय व अभिजात मराठीचे पदाधिकारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर अभिजात मराठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संध्या देशपांडे, आप्पासाहेब गुरव, अनंत लाड व डॉ. विनोद गायकवाड, वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद गिजरे, कार्यवाह आर. एम. करडीगुद्दी उपस्थित होते. संध्या देशपांडे यांनी आस्ताद काळे व उत्तरा मोने यांचा परिचय करून दिला. मनीषा सुभेदार यांनी संजय मोने व ऐश्वर्या नारकर यांचा परिचय करून देऊन सूत्रसंचालन केले. त्यांच्यासह सुहास सांगलीकर, आप्पासाहेब गुरव व संध्या देशपांडे यांनी कलाकारांचा सत्कार केला. अनंत लाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला समर्थ सोसायटी, सुभाष कुलकर्णी, आशा रतनजी, सूर्यकांत शानभाग, चित्पावन ब्राह्मण संघ, मराठी भाषा प्रेमी मंडळ, हमारा देश संघटना, वसंत व्याख्यानमाला, फ्रेंड्स सर्कल यांचे सहकार्य लाभले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article