एकॉन अन् टोमेका होणार विभक्त
हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक एकॉन आणि त्याची पत्नी टोमेका थियम यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. थियमने घटस्फोटामागे परस्परांमधील मतभेद कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. हे दांपत्य 3 दशकांपासून एकत्र होते. परंतु आता ते विभक्त होत असल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
एकॉन आणि थियम यांची भेट 1990 च्या दशकाच्या प्रारंभी जॉर्जियामध्ये एका मित्राच्या अपार्टमेंटमध्ये झाली होती. तेव्हा टोमेका 18 वर्षांची तर एकॉन 20 वर्षांचा होता. नंतर दोघांनी 1996 मध्ये विवाह केला होता. एकॉनला 5 वेगवेगळ्या महिला जोडीदारांकडून 9 अपत्यं आहेत. तर टोमेका थियमपासून त्याला एक 17 वर्षांची मुलगी आहे.
एकॉनची पत्नी थियमने घटस्फोटाचा अर्ज केला असून विभक्त होण्याची अधिकृत तारीख निश्चित होणार आहे. थियम यांनी स्वत:ची मुलगी जर्नीच्या संयुक्त ताब्याची विनंती केली असून यामुळे एकॉनला तिला भेटण्याचा अधिकार मिळणार आहे.
बहुविवाह सामान्य असून तो आमच्या संस्कृतीचा हिस्सा आहे. पाश्चिमात्य जगतात आलो असलो तरीही आम्ही आमच्या आफ्रिकन संस्कृतीतून बाहेर पडलेलो नाही. पाश्चिमात्य जगताने निसर्गाला विचारात न घेता सर्व नियम तयार केले आहेत. मी स्वत:ची जबाबदारी पार पाडत आहे, परिवाराच्या सर्व गरजा भागवत असल्याचा दावा एकॉनने केला आहे.