दुहेरी हत्याकांडाने अकोळ हादरले
निपाणी/प्रतिनिधी
मायलेकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार अकोळ ( ता. निपाणी) येथे बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास उघडकीस आला. या दुहेरी हत्याकांडाने निपाणी परिसर हादरला असून पोलिसांनी खून प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेतले आहे. मंगल सुकांत नाईक वय 45, प्रज्वल सुकांत नाईक वय 22, दोघेही रा. अकोळ असे मृत मायलेकाचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज असून त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री 10 च्या सुमारास नात्यातील दोघेजण मंगल यांच्या घरी आले होते.
याचवेळी या दोघांचा मंगल आणि प्रज्वल यांच्याशी वाद झाला. त्यावेळी रागाच्या भरात संशयित दोघांनी मंगल आणि प्रज्वल यांच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केला. यात दोघेही जागीच गतप्राण झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच रात्री बाराच्या सुमारास जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अथणीचे डीएसपी प्रशांत मुन्नोळी, सीपीआय बी. एस. तळवार, ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवराज नायकवडी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर तात्काळ तपासाची सूत्रे गतिमान करत तासाभरातच पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याचे समजते. सदर घटनेतील दोघेही संशयित आरोपी हुक्केरी तालुक्यांतील कोणकेरी येथील आहेत.