Solapur Crime : युवकाच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना अकलूज पोलिसांकडून अटक
अकलूजमध्ये युवकाचा मृत्यू नव्हे, खून असल्याचे उघड
अकलूज : अकलूज शहरातील शनी घाट, नीरा नदीच्या पात्रामध्ये २२ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास मेघराज युबराज हिलाल (वय २१, रा. काझी गल्ली, अकलूज) या युवकाचा मतृदेह नदीपात्रामध्ये मिळून आला होता. त्यावरून अकलूज पोलीस ठाण्यास अपमृत्यूप्रमाणे नोंद करण्यात येऊन याची चौकशी पोहेकॉ अमोल बकाल करीत होते. त्यांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
या तपासाबाबत मार्गदर्शक सूचना पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाळके यांनी दिल्या होत्या. या चौकशीमध्ये साक्षीदार यांच्याकडे तपास, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक तपासाच्या आधारे मेघराज युबराज हिलाल याचा मृत्यू हा घातपात असल्याचे निष्पन्न झाले.
तपासामध्ये आरोपी १) रोहित रघुनाथ क्षत्रीय, २) राहुल रघुनाथ क्षत्रीय, ३) रोहन सुनील शिंदे (रा. सर्वजण, काझी गल्ली, अकलूज) यांनी २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास हिलाल व आरोपी यांच्यात वाद झाल्याच्या कारणावरून त्यास जबरदस्तीने नीरा नदीच्या पात्रामध्ये नेवून पाण्यामध्ये बुडवून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हे गुन्हा केल्यापासून फरार झाल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने अकलूज पोलीस ठाणे कडील सपोनि योगेश लंगुटे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने आरोपी रोहित रघुनाथ क्षत्रीय, राहुल रघूनाथ क्षत्रीय यांना वाशी (जि. धाराशिव) या ठिकाणावरून ताब्यात घेतले. आरोपी रोहन सुनील शिंदे यास अकलूज येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
यातील आरोपी यांच्याकडे तपास करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज विभाग संतोष बाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरज उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोहेकों अमोल बकाल, पोहेकॉ समीर पठाण, पोहेकों शिवकुमार मदभावी, पोहेकॉ विक्रम घाटगे, पोहेकों तुषार गाडे, पोहेकॉ कंठोळी, पो कॉ रणजित जगताप यांनी केलेली आहे.