For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुरुंगात आझम खानांच्या भेटीला अखिलेश

06:22 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
तुरुंगात आझम खानांच्या भेटीला अखिलेश
Advertisement

रामपूर मतदारसंघासंबंधी चर्चा 

Advertisement

वृत्तसंस्था/ सीतापूर

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे शुक्रवारी सीतापूर तुरुंगात पोहोचले. तेथे त्यांनी तुरुंगात कैद पक्षनेते आझम खान यांची भेट घेतली आहे. सीतापूर तुरुंग प्रशासनाने सुमारे एक तासाच्या भेटीची वेळ निश्चित केली होती. बनावट जन्म प्रमाणपक्ष प्रकरणी सप नेते आझम हे अनेक महिन्यांपासून तुरुंगात कैद आहेत.

Advertisement

अखिलेश यादव आणि आझम यांच्यात रामपूर लोकसभा मतदारसंघावरून चर्चा झाल्याचे समजते. या भेटीनंतर अखिलेश यादव हे या मतदारसंघातील उमेदवाराची  घोषणा करू शकतात. परंतु उमेदवार कोण असणार याबद्दल अद्याप कयासच वर्तविले जात आहेत. अखिलेश आणि आझम यांच्या भेटीमुळे उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण मात्र तापले आहे.

आझद खान यांची अखिलेश यांनी आतापर्यंत दोनवेळा तुरुंगात भेट घेतली आहे. अखिलेश हे सीतापूर तुरुंगात पोहोचण्यापूवी सपचे अनेक कार्यकर्ते तेथे दाखल झाले होते. यादरम्यान मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अखिलेश यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले आहे. अखिलेश यांच्यासोबत सपचे राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार अनुप गुप्ता तसेच रामपूरचे सप अध्यक्ष होते.

बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी सप नेते आझम खान, त्यांच्या पत्नी तंजीन फातिमा आणि पुत्र अब्दुल्ला आझम यांना न्यायालयाने दोषी ठरवून प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती. बनावट जन्म प्रमाणपत्राचे प्रकरण 2017 च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीशी संबंधित आहे. त्यावेळी अब्दुल्ला आझमने रामपूरमधील स्वार मतदारसंघात सपच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत तो विजयी झाला होता. परंतु त्याच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. अब्दुल्लाने उमेदवारी अर्जात नमूद केलेली जन्मतारीख खोटी असल्याचा दावा करण्यात आला होता. अब्दुल्लाची शैक्षणिक प्रमाणपत्रातील जन्मतारीख 1 जानेवारी 1993 आहे. तर जन्मप्रमाणपत्रात 30 सप्टेंबर 1990 असा उल्लेख होता. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत सादर करण्यात आलेले जन्मप्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले होते.

Advertisement
Tags :

.