लोकमान्यतर्फे आकाशकंदील प्रदर्शनाला प्रारंभ
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हेरवाडकर स्कूलमध्ये आयोजन
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे दोनदिवसीय आकाशकंदील प्रदर्शनाला सोमवारपासून प्रारंभ झाला. टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर इंग्रजी माध्यम शाळेमध्ये लोकमान्यचे संचालक पंढरी परब, एसकेईचे व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभु यांच्या हस्ते फीत सोडून उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले आकाशकंदील प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. सायंकाळी 4 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्ट, हेरवाडकर इंग्रजी माध्यम स्कूल, ठळकवाडी हायस्कूल, मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, स्वाध्याय विद्या मंदिर, शानभाग स्कूल, भंडारी स्कूल व आरपीडी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाशकंदील मांडण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी खाद्यपदार्थांचे स्टॉलही मांडले आहेत. यामध्ये फराळ, दिवे व पणत्या, आकाशकंदील आणि इतर खाद्यपदार्थांच्या स्टॉलचा समावेश आहे. यावेळी पाहुण्यांनी स्टॉलची पाहणी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी लोकमान्यचे राजू नाईक, प्राचार्या शोभा कुलकर्णी, हेमांगी प्रभु, स्कूल ऑफ आर्टचे सुभाष देसाई, एम. बी. हुंदरे यासह पालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.