For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जवानांच्या हाती आता ‘एके-203’

06:24 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
जवानांच्या हाती आता ‘एके 203’
Advertisement

‘आयआरआरपीएल’कडून 35 हजार असॉल्ट रायफल्स प्राप्त : एका मिनिटात 700 राउंड फायर करण्याची क्षमता

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड (आयआरआरपीएल) ह्या भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय सैन्याला 35 हजार एके-203 असॉल्ट रायफल्स देण्यात आल्या आहेत. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत 2021 मध्ये त्यांचे उत्पादन सुरू करण्यात आले होते. या रायफलचे वैशिष्ट्या म्हणजे ती एका मिनिटात 700 राउंड फायर करू शकते. तसेच ती वजनाने हलकी असून कधीही जॅम होत नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

Advertisement

‘आयआरआरपीएल’ने भारतात एके-203 कलाश्निकोव्ह असॉल्ट रायफल निर्मितीसाठी प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. यासह भारत एके-203 मालिका असॉल्ट रायफल तयार करणारा पहिला देश ठरला आहे. कलाश्निकोव्ह एके-203 असॉल्ट रायफल ही एके-200ची सुधारित आवृत्ती असून ती भारतीय सैन्यात वापरल्या जाणाऱ्या 7.62×39 एमएम काडतूससाठी वापरली जाणार आहे. लष्कराशिवाय भारतातील सुरक्षा यंत्रणांनाही एके-203 असॉल्ट रायफल्सने सुसज्ज केले जाईल. याशिवाय ‘आयआरआरपीएल’ ही रायफल इतर देशांनाही निर्यात करू शकेल.

एके-203 रायफल ‘इन्सास’पेक्षा वेगळी

भारतीय लष्कर 1996 पासून इन्सास रायफल वापरत आहे. सध्या तिन्ही सैन्यांकडे सुमारे 7 ते 8 लाख इन्सास रायफल आहेत. इन्सासच्या तुलनेत एके-203 रायफल लहान, हलकी आणि जास्त मारक आहे. एके-203 चे वजन 3.8 किलो आहे. तर इंसास रायफलचे वजन मॅगझिन आणि संगीन नसतानाही 4.15 किलो आहे. इन्सासची लांबी 960 मिलीमीटर आहे, तर एके-203 ची लांबी 705 मिलीमीटर आहे. ही एके-47 मालिकेची प्रगत आवृत्ती असून ती कधीही जाम होत नाही. कडाक्मयाची थंडी, उष्णता आणि पावसाचाही त्यावर काही परिणाम होत नाही. वजन आणि लांबी कमी झाल्यामुळे युद्धादरम्यान सैनिकांसाठी एके-203 सोयीस्कर होईल. भारतीय जवानांना कमी थकवा जाणवेल. त्याच्या लहान लांबीमुळे, त्याची हाताळणी सुलभ होईल, असा दावा ‘आयआरआरपीएल’ने केला आहे.

‘आत्मनिर्भर’ निर्मिती

मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळात सुरक्षा दलांना गरजेनुसार शस्त्रे खरेदी करण्याचे स्वातंत्र्य दिले. या अंतर्गत रशियातून सुमारे 25 हजार एके-203 रायफलची पहिली खेप आली. नंतर 2023 मध्ये कोरवा ऑर्डिनन्स पॅक्टरीत त्यांचे उत्पादन सुरू झाले. येथे एकूण 7 लाख रायफल्स बनवल्या जाणार आहेत, त्या पूर्णपणे स्वदेशी असतील.

भारत-रशिया यांच्यात 2021 मध्ये करार

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 2019 साली उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात कोरवा येथे ‘आयआरआरपीएल’ कारखान्याची पायाभरणी करण्यात आली. यानंतर भारत-रशियाने डिसेंबर 2021 मध्ये करारावर स्वाक्षरी केली. या अंतर्गत रशियाकडून सुमारे 1 लाख रायफल्स येणार होत्या. कोरवा येथे उर्वरित 7.63×39 एमएम काडतुसासाठी 6 लाख एके-203 रायफल्सचे उत्पादन सुरू आहे.

Advertisement
Tags :

.