For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अजित रेड्डी यांनी स्वीकारला कॅन्टोन्मेंट बोर्डचा पदभार

09:36 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
अजित रेड्डी यांनी स्वीकारला कॅन्टोन्मेंट बोर्डचा पदभार
Advertisement

अधिकाऱ्यांची घेतली बैठक : पत्रकारांना टाळण्याचा प्रयत्न

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सीईओपदी बेंगळूर येथील बी. अजित रेड्डी यांची वर्णी लागली. मंगळवारी त्यांनी कार्यालयात दाखल होऊन कार्यभार स्वीकारला. कार्यालयात दाखल होताच त्यांनी सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन माहिती जाणून घेतली. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या माजी सीईओंनी अचानक आपले जीवन संपविल्याने हे पद रिक्त होते. त्याठिकाणी बेंगळूर येथील अजित रेड्डी यांची नेमणूक करण्यात आली. अजित रेड्डी यांनी यापूर्वी सिकंदराबाद त्यानंतर बेंगळूर येथेही संरक्षण दलाच्या विविध पदांवर काम केले आहे. डिफेन्स इस्टेट ऑफिसर म्हणून त्यांनी सेवा बजावली असून पहिल्यांदाच ते बेळगावमध्ये सेवा बजावित आहेत.

सीबीआय चौकशीचे पुढे काय?

Advertisement

कॅन्टोन्मेंट बोर्डच्या नोकर भरतीत झालेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधण्यासाठी मागील 15 दिवसांपासून सीबीआय चौकशी सुरू होती. यापुढेही सीबीआय चौकशी सुरू राहील, असे सांगण्यात आले होते. परंतु सीबीआय चौकशी पुढे काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. भ्रष्टाचारात अडकलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? हे पाहावे लागणार आहे. त्यामुळे नवीन सीईओ भ्रष्टाचार प्रकरणाला कोणती दिशा देतात, हे येणाऱ्या काळात समजेल.

नव्या सीईओंना पत्रकारांची धास्ती?

सीईओपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विविध माध्यमांचे पत्रकार त्यांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु दोन तास उलटले तरी त्यांनी पत्रकारांना भेट देणे टाळले. यापूर्वीचे सीईओ के. आनंद यांनीही पत्रकारांना भेट नाकारली होती. तसेच इतर कार्यक्रमांनाही माध्यम प्रतिनिधींना टाळाटाळ केली जात होती. हाच कित्ता नवे सीईओदेखील गिरविणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यामुळे नव्या सीईओंनी पत्रकारांची इतकी का धास्ती घेतली? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

Advertisement
Tags :

.