अजितदादांनी केली मित्रांची परतफेड!
‘एक देश एक निवडणूक’ या विषयावर चर्चा झडत असतानाच महाराष्ट्रात विधानसभेची तयारी सुरू आहे. महायुतीतील नेते सामंजस्याची भूमिका घेतील असे अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर वाटत असतानाच अजितदादांनी संघ आणि भाजप कार्यकर्ते, आमदार-खासदार आणि शिंदे समर्थकाना बुलढाण्यात थेट वाचाळवीर म्हणून परतफेड केली. ठाकरे सेनेला जसे हिंदुत्व सोडायचे नाही तसेच अजितदादांना भाजपसोबत राहूनही शिव, शाहू, फुले आंबेडकर ही लाईन सोडायची नाही. यावरूनच दोघांची मुळे रुजलीत कुठे आणि आता उगवलेय कुठे हे लक्षात येते. भविष्यात जर राजकारण पुन्हा बदलले तर त्याची बीजे इथेच असतील.
काँग्रेस आणि शिवसेनेतील कुरबुरी लपून राहिलेल्या नाहीत. खुद्द पवारही परिस्थितीची गरज म्हणून ठाकरेसेनेशी जुळवून घेत असले तरी अनेक मतदारसंघात त्यांना ठाकरेंचा आणि ठाकरेंना पवार आणि काँग्रेस पाठीराख्यांचा त्रास नकोसा झाला आहे. तसेच भाजप आणि शिंदे सेनेच्या कट्टर गटाला अजित पवार नकोसे आहेत, हेही लपून राहिलेले नाही. ठाकरे सेना आपला पक्ष सोडून गेलेल्या आमदारांच्या विरोधात लढू इच्छित असलेल्या अनेक मतदारसंघातील विरोधी उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी श.प. कडे आहेत आणि त्यांनी आपल्या पक्षाची साथ सोडू नये यासाठी दोन्ही काँग्रेसी अंतर्गत तडजोडीत गुंतले आहेत. लोकसभेला कोकण, मुंबई, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील काही मतदारसंघ शिवसेनेच्या हातून सहज निसटले. त्यामागे हाच हट्ट होता. तर आपल्यामुळे काँग्रेसचे अनेक उमेदवार विजयी झाले मात्र तशी काँग्रेसची सेनेला साथ मिळाली नाही अशी शिवसेनेत खदखद आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये दोन्ही काँग्रेसमुळे शिवसेनेचे भाजप करत होते तितकेच नुकसान होत आहे, अशी भावना प्रबळ होत चालली आहे. या भावनेतून भविष्यात उद्धव ठाकरे यांना वेगळे लढण्याचा सैनिकांच्या आग्रहाचा एपिसोड महाराष्ट्रात पहायला मिळाला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. अर्थात या जर तरच्या गोष्टी. मात्र अलीकडे यापैकी कशालाही नकार देता येणे अशक्य आहे. त्यामुळेच कधी संजय राऊत उघडपणे काँग्रेस नेत्यांना वेळ नसल्याबद्दल डिवचत असतात. तर कधी वर्षा गायकवाड महिला मुख्यमंत्री व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करताना रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचे नाव घेतात. त्याचे परिणाम त्यांच्या पक्षात काय होतील याचा विचार खासदारकी आणि मंत्रीपद उपभोगलेल्या व्यक्तीच्या मनात आला नसेल हे म्हणणेही हास्यास्पद ठरेल. पण, तरीही काँग्रेस आणि ठाकरे सेनेचा अनुभव असणाऱ्या थोरल्या पवारांनी ही मोट बांधून ठेवली आहे. त्यासाठी जागा वाटपात तडजोडीची तयारी असल्याचे संकेत दिले जात आहेत. प्रत्यक्षात प्रत्येकाला काही विशिष्ट मतदारसंघ हवेच आहेत. एका मतदारसंघावर तिघांचे हक्क अनेक ठिकाणी सांगितले जात आहेत. कारण, सर्वांनाच खुणावत आहे ते निवडणूक पूर्व चाचण्यांचे अंदाज! महाआघाडीच्या नेत्यांमध्ये अशीच रस्सीखेच सुरू राहिली तर शेखचिल्ली प्रमाणे ते बसलेलीच फांदी तोडून जमिनीवर येऊ शकतात.
महायुतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विद्वानांनी अशाच प्रकारे फांदीवर घाव घालून अजित पवारांना दूर करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण त्यांचे प्रयत्न सहन करतील ते अजित पवार कसले? काँग्रेसच्या भल्याभल्या नेत्यांना राजकारणात हैराण केलेल्या अजित पवार यांनी संघाला एकदा सोडून तीनदा डिवचले आहे. हिवाळी अधिवेशनात संघ मुख्यालयाकडे जाणे त्यांनी टाळले. त्याच्या बातम्या झाल्या. नंतर लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आणि साप्ताहिक विवेकमधून भाजप कार्यकर्ते, बूथ प्रमुख यांना अजित पवार मान्य नसल्याचे उघडपणे जाहीर केले गेले. अलीकडे लाडकी बहीण योजनेचा मेळावा असल्याने सर्व नेते नागपूरला गेले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस संघ मुख्यालयात पोहोचले. पण, अजित पवार तिकडे फिरकले नाहीत. त्यांनी संघवाल्यांच्या विरोधाला किंमत देत नसल्याचे कृतीतून दाखवून दिले. मोदी, शहांनी आपल्याला महायुतीत आणि सत्तेत घेतले आहे. त्यामुळे इतरांचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही असेच ते दाखवून देत आहेत. संघाला आणि भाजपातील विशिष्ट मंडळींना धक्का देत असताना शिंदेंच्या शिलेदारांनाही ते सोडत नाहीत. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या स्वत:च्या मतदारसंघात त्यांच्याच व्यासपीठावरून अजित पवारांनी त्यांना शिवाय भाजपचे खासदार अनिल बोंडे, आमदार राणे अशांना वाचाळवीर ठरवले. हा ठरवून संघाला दिलेलाच धक्का होता. आपली विचारसरणी कुठली आहे आणि तिच्याशी आपली तडजोड नाही, हे पवारांच्या मतदारांना दाखवण्याचा त्यांचा यात प्रयत्न आहे. कितीही गोंजारले तरी ‘ते’ आपल्याला परकेच मानणार तर मग पाणउतारा का करू नये? याचा पक्का विचार अजित पवारांनी केलेला दिसतो. यातून जरी आपल्या मतांची घसरण थांबली आणि काकांचे दार किलकिले होऊ शकतात असा संदेश मिळाला तरी जागा वाटपात आपला आवाज राखता येईल हा दादांचा अंदाज आहे. शिंदे सेनेचे संजय गायकवाड यांच्या मतदारसंघात ठाकरे सेनेकडे तगडा उमेदवार नाही. काँग्रेस आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्याकडे चार चेहरे आहेत आणि भविष्यात यांच्याशी लढायचे तर राहुल गांधींचेच नाव काढूया असा विचार करून संजय गायकवाड बोलून गेले. त्यांना वादग्रस्त होण्याची हौसच असल्याने दादांनी आणि शिंदे, फडणवीस दोघांना घायाळ केले. तुमच्या वक्तव्याने आपली मते दूर जातात हेही त्यांनी सांगून टाकले. अजित पवारांवर टीका करून आपल्या मतदारांना सुखावण्याचा भाजपचा प्रयत्न आणि ठाकरे यांची सत्ता सोडताना अजित पवारांच्या नावाने खडे फोडण्याचा शिंदे सेनेचा वचपा दोन्हीची परतफेड अशा प्रकारे अजितदादांनी करून दाखवली आहे. सरकारच्या योजना आपणच कशा अमलात आणल्या याचे वाढवून, चढवून दावे करत आहेत. त्यामुळे साडेचार हजार कोटीच्या चेकवर सही केल्याचे अजित पवारांना सांगावे लागते. योजना बंद होणार नाहीत उलट वीज आणि बरेच काही मोफत देतोय असे फडणवीस सांगत आहेत. पुन्हा सत्ता दिली तर दिडाचे दोन किंवा तीन हजारही करू, मुलींना मोफत शिक्षण, संरक्षण, जन्मताच ठेव देऊ, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. मार्केटिंगचे हे अफलातून नमुने या निमित्ताने दर्शन देऊन जात आहेत. महायुती असो की महाविकास आघाडी सर्वांना परिस्थितीचा लाभ हवा आहे. आपल्या पोळीवर सत्तेचे तूप सर्वाधिक कसे येईल याची सर्वांना चिंता आहे. त्यासाठी हातात हात असल्याचे दाखवत पायात पाय अडकवून एकमेकाला जखडून ठेवण्याचे काम सगळ्याच राजकीय पक्षांकडून सुरू झाले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात त्यामुळे समीकरणे वेगवेगळी असतील. नेते गाव आणि विभाग बदलले की तंबूही बदलतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे मूळ लढाई बरोबर या उपलढाया अधिक त्वेषाने सुरू झालेल्या आहेत. प्रत्येकाच्या प्रभाव क्षेत्रात त्या त्या मित्र पक्षाला वाढू देण्याऐवजी संकुचित राजकारणाचे दर्शन घडवणारे नेते वाढल्याने मतदारांना 2019 ते 24 या पाच वर्षात जे खेळ बघायला मिळाले त्यापेक्षा जुन्याच गारुड्यांचे नवे खेळ अधिक तापदायक असतील. वैशिष्ट्या म्हणजे राज्याच्या टोपलीत गुंडाळलेल्या या सर्व नेत्यांचे दात आणि विष काढून एक गारुडी मजा बघतोय हे विसरून राज्याचे नेते फणा काढून एकमेकांना फुसफुसत आहेत!
शिवराज काटकर