For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ajit Pawar NCP: युती होणार म्हणून आम्ही गप्प बसलो, अजितदादांची नेमकी दिशा काय?

11:38 AM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
ajit pawar ncp  युती होणार म्हणून आम्ही गप्प बसलो  अजितदादांची नेमकी दिशा काय
Advertisement

कोणताही आडपडदा न ठेवता मांडलेली मतेही सध्या चर्चेचा विषय ठरलेली दिसतात

Advertisement

By : प्रशांत चव्हाण

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा दादा स्पष्टपणे आपली भूमिका सर्वांसमोर मांडत असतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात दादांनी कोणताही आडपडदा न ठेवता मांडलेली मतेही सध्या चर्चेचा विषय ठरलेली दिसतात. यातून त्यांनी पुन्हा एकदा आपला स्वतंत्र बाणाच दाखवून दिला असून, सर्व पर्याय खुले ठेवल्याचे दिसून येत

Advertisement

महायुतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीसह भाजप व शिंदेंची शिवसेना असे तीन प्रमुख पक्ष एकत्र आहेत. याशिवाय अन्य घटक पक्षांचाही युतीमध्ये समावेश आहे. न्यायालयाच्या निकालानंतर आगामी चार महिन्यांमध्ये महापालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे.

यामध्ये मुंबई, पुण्यासारख्या मेट्रोसिटींसह अन्य महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. हे बघता किमान महत्त्वाच्या ठिकाणी तरी तीन पक्ष एकत्रित निवडणुका लढविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तथापि, अजितदादांनी घेतलेली भूमिका बघता अनेक ठिकाणी तिन्ही पक्ष परस्परांविरोधात लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणेकरांच्या समस्या सोडवायच्या असतील, तर राष्ट्रवादी काँग्रेससारखा दुसरा पर्याय नाही, असे दस्तूरखुद्द दादाच म्हणतात. त्यापुढे जाऊन ‘माझा चेहरा घेऊन पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील नागरिकांसमोर जाऊ,’ असेही ते म्हणतात. यातून दादांची दिशा काय, हेच स्पष्ट होते.

राज्यात 1999 ते 2014 या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती होती. पण, स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी जिल्हा स्तरावरील नेत्यांना निर्णयाचे अधिकार देण्यात आले होते. आगामी निवडणुकीतही हाच ट्रेंड राहणार असल्याचे सूतोवाच दादांनी केले आहे. युती होणार म्हणून आम्ही गप्प बसलो, असल्या सबबी चालणार नाहीत.

कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा स्पष्ट सूचना अजितदादांनी दिल्या आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे लढण्याच्या दृष्टीने पुणे व पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांनी तयारी केल्याचे दिसून येते. पुणे आणि पिंपरी चिंचवड हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, कालांतराने पवार कुटुंबीयांनी या पट्ट्यात आपला प्रभाव निर्माण केला. पिंपरी-चिंचवड हे अजितदादांचे होम ग्राऊंडच.

बारामतीनंतर दादा कुठे अधिक रमले असतील, तर या उद्योगनगरीत. काँग्रेसचे तत्कालीन नेते रामकृष्ण मोरे यांचा प्रभाव मोडीत काढून त्यांनी या शहरात आपली स्वतंत्र ओळख तयार केली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पालिकेत पक्षाची सत्ताही आणली.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार विलास लांडे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे या सगळ्यांचे राजकीय करिअर घडविण्यातही त्यांचा वाटा राहिल्याचे दिसले. पुण्यातील काँग्रेस नेते सुरेश कलमाडी विऊद्ध अजितदादा हा वादही अनेकांच्या स्मरणात असेल. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दादांनी कलमाडींचे संस्थान कसे उलथवून टाकले, हा इतिहासही तसा फार जुना नाही.

तथापि, 2014 च्या मोदी लाटेत सगळीच समीकरणे उलटीपालटी झाली. पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत एकहाती वर्चस्व मिळवले. तेव्हापासून दोन्ही महापालिकांवर भाजपचा वरचष्मा आहे. असे असले तरी आजही या भागात राष्ट्रवादीचा प्रभाव टिकून आहे. विशेषत: पिंपरी-चिंचवडमध्ये दादांना मानणारा मोठा वर्ग आहे.

नियोजनबद्ध व स्मार्ट पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार म्हणूनही त्यांचा उल्लेख होतो. प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, उद्याने, ग्रेड सेपरेटरसारखे प्रकल्प दादांच्याच काळात उभे राहिल्याचेही दाखले दिले जातात. मधल्या काळात भले हा गड हातातून निसटला असेल. मावळातून पुत्र पार्थलाही पराभव पत्करावा लागला असेल. पण, दादांनी पिंपरी-चिंचवडशी असलेली आपली नाळ तोडलेली नाही.

पुण्याबाबतही तेच म्हणता येईल. दोन्ही महापालिकांसह जिल्ह्यात दादांच्या राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. त्या पाठबळावरच ते भाजपला थेट आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. त्यादृष्टीने कुठलीही पावले पडताना दिसत नसली, तरी दोन्ही पक्षांमधील सलगी वाढल्याचे दिसून येते.

दुसऱ्या बाजूला प्रामुख्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीचेच नेते कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकल्याचे पहायला मिळते. या पार्श्वभूमीवर अजितदादांनी पुणे जिल्ह्यात वेळप्रसंगी भाजपाशी दोन हात करण्याची घेतलेली भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. आता प्रत्यक्ष रणभूमीवर अजितदादा हा स्वतंत्र बाणा दाखवणार का, याचीच उत्सुकता असेल.

Advertisement
Tags :

.