अजित पवार महायुतीमध्ये आल्यानेच आठवले गटाला मंत्रिमंडळात जागा नाही; रामदास आठवलेंचा आरोप
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुती सरकारमध्ये समावेश झाल्यामुळेच आपल्या पक्षाला राज्यात मंत्रिपद मिळाले नसल्याचा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज केला आहे. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला १५० ते १६० जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रामदास आठवलेंच्या या आरोपामुळे महायुतीमधील धुसफुस समोर आली असून अजित पवार यावेळी केंद्रस्थानी आहे.
केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डहाणू जिल्हा दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्याकडे रोख मिरवताना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामिल झाल्यानेच आरपीआय आठवले गटाला मंत्रीमंडळात जागा मिळू शकली नाही. आमच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपदे, दोन महामंडळांचे अध्यक्षपद आणि जिल्हास्तरीय समित्यांमध्ये योग्य सन्मान देण्याचेही आश्वासन देण्यात आले होते. मात्र अजित पवारांमुळे हे मिळू शकले नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आरपीआय (ए) ला 12 जागा लढवायला हव्यात. आम्हालाही राज्य मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे असा दावा केला.