Kolhapur Political News: अजित पवारांना राज्याच्या नेतृत्वाची संधी मिळावी : के. पी. पाटील
'आम्हाला काही नको फक्त अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा'
भोगावती : प्रशासनावर अचूक पकड असणारा कणखर नेता म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ओळख साऱ्या महाराष्ट्राला आहे. त्यांना राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी मागणी आहे. आम्हाला काही नको फक्त अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी मंगळवारी राशिवडे येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राशिवडे येथे वृषारोपण, रुग्णांना फळे वाटप व राष्ट्रवादी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता. त्याप्रसंगी माजी आमदार श्री पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने व गोकुळचे संचालक युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तर वक्रतुंड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आंबा रोपांचे वृषारोपण करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिह्यांत राष्ट्रवादीने सर्वात जास्त पदवीधर मतदार नोंदणी केली. तर प्रताप उर्फ भैय्या माने यांना उमेदवारी मिळण्यात काही अडचण येणार नसल्यचे स्पष्ट केले. तर कागल तालुक्यापेक्षा राधानगरी भुदरगड तालुक्यात मतदार नोंदणी जास्त करण्याचे सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले.
स्वागत जि. प. चे माजी सदस्य विनय पाटील यांनी केले. त्यानंतर प्रास्ताविक गोकुळचे संचालक प्रा किसनराव चौगले यांनी केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे, गोकुळचे संचालक युवराज पाटील व रणजित पाटील, माजी संचालक फिरोजखान पाटील, माजी सभापती संजय कलिकते, हुतात्मा स्वामी वारके सूत गिरणीचे अध्यक्ष उमेश भोईटे, कागलचे शहराध्यक्ष संजय चितारी, दत्ताजी पाटील केनवडेकर, बिद्रीचे संचालक राजेंद्र पाटील व राजेंद्र भाटळे, धनाजीराव पाटील, राजेंद्र पाटील, प्रा. शिवाजी घाटगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.भिकाजी एकल यांनी आभार मानले.