Ajit and Rohit Pawar: काका-पुतण्यातील वादालाही ईडीची किनार, साथ सोडली पाठ नाही
राष्ट्रवादी फुटीमागे अजित पवार यांच्यामागे लागलेली ईडीची पीडा एक कारण होते
By : संतोष पाटील
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यातील ‘वैचारिक’ वादाला ईडीच्या कारवाईची किनार होती. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मोठ्या पवारांसह खासदार सुप्रिया सुळे यांनीही दादांबद्दल सौम्य भूमिका स्वीकारली मात्र, रोहित पवार यांनी काकादादांची साथ सोडली असली तरी पाठ सोडली नव्हती. यातून रोहितदादांच्या मागे ईडीची पीडा लागल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी फुटीमागे अजित पवार यांच्यामागे लागलेली ईडीची पीडा हे एक कारण होते. राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर मोठे पवार यांनी सुरुवातीचा काही काळ अजित पवारांना टार्गेट केले. विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या पवारांनी अजित पवार यांच्यावर थेट टीका करणे टाळले.
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याबाबत सौम्य भूमिका घेतली. मात्र याचवेळी अजित पवार आणि त्यांच्या शिलेदारांवर आमदार रोहित पवार सातत्याने टीकास्त्र सोडत होते. यापार्श्वभूमीवर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी नोटीस पाठवली.
अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातील वाद आणि ईडी कारवाई यांच्यातील संबंध, त्याचे राजकीय परिणामांची यानिमित्ताने पुन्हा चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये शरद पवार यांनी केली. अजित पवार, शरद पवार यांचे पुतणे, हे पक्षाचे प्रमुख नेते आणि बारामती मतदारसंघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व करणारे आमदार राहिले आहेत.
दुसरीकडे, रोहित पवार, शरद पवार यांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार, हे युवा नेते म्हणून उदयास आले. 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली आणि शरद पवार गटाचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले.
2023 मध्ये अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करून 40 पेक्षा जास्त आमदारांसह स्वतंत्र गट स्थापन केला आणि सत्ताधारी महायुतीत सामील झाले. यामुळे शरद पवार गट कमकुवत झाला आणि रोहित पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळत अजित पवार गटावर आणि सत्ताधारी पक्षांवर सातत्याने टीका केली.
या राजकीय वादामुळे पवार कुटुंबात आणि पक्षात उभी फूट पडली. जी अनेकदा सार्वजनिक मंचावरून दिसून आली. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना सत्ताधारी पक्षांकडून पद्धतशीर कोंडी होत असल्याचा आरोप केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली असतानाच रोहित यांच्यावरील ईडी कारवाईने वादाला नवीन आयाम मिळाले.
ईडीने रोहित यांच्याविरुद्ध एमएससीबी घोटाळ्याप्रकरणी पूरक आरोपपत्र दाखल केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणाची सुरुवात 2019 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या एफआयआरपासून झाली. एमएससीबीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी सहकारी साखर कारखाने त्यांच्या नातेवाईकांना आणि खासगी व्यक्तींना कमी किंमतीत विकल्याचा आरोप आहे.
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने औरंगाबादमधील कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी केला. या लिलाव प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडीने अॅग्रोची 50 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त केली आणि रोहित पवार यांची दोनदा चौकशी केली.
एकाला क्लिनचिट आणि दुसऱ्यावर कारवाई कशी?
2023 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी अजित पवार गटावर सातत्याने टीका केली. याउलट, अजित पवार यांच्यावरही एमएससीबी घोटाळ्याप्रकरणी आरोप होते. परंतु त्यांना डिसेंबर 2024 मध्ये दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक लवादाकडून क्लीन चीट मिळाली.
यामुळे रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, 97 जणांवर आरोप असताना केवळ त्यांनाच लक्ष्य का केले जात आहे? एकाला क्लिनचिट आणि दुसऱ्यावर कारवाई कशी ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
पवार कुटुंबातील अंतर्गत संघर्ष
अजित पवार यांनी पक्ष फोडल्यानंतर रोहित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे कुटुंबातील तणाव वाढला. मे 2024 मध्ये अजित पवार यांनी रोहित यांच्यावर टीका करताना म्हटले की, याला जिल्हा परिषदेचे तिकीट मी दिले, आमदारकीचे तिकीट मी दिले आणि हा माझ्यावर टीका करतोय. यावर रोहित यांनी प्रत्युत्तर दिले, की अजित पवार यांना राजकीय लायकी शरद पवार यांनीच दिली. ही वक्तव्ये कुटुंबातील तीव्र वाद दर्शवत होती.
मी ऐकलं नाही म्हणूनच कारवाई
"ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर आहे. ईडीचे अधिकारी केवळ आदेशांचे पालन करत आहेत. आता हे प्रकरण न्यायालयात आहे. 2012 मध्ये बारामती अॅग्रोने कन्नड कारखाना खरेदी केला, तेव्हा एमएससीबीवर प्रशासक होते. त्यांच्या नावाचा उल्लेख ’त्या’ 97 व्यक्तिंच्या यादीत नव्हता. त्या 97 व्यक्ती सोडून एकावरच कारवाई कशी होते?"
- आमदार रोहित पवार