मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक
मुंबई :
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. या निवडणुकीत अजिंक्य नाईक यांचा विजय झाला असून त्यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 107 मतांनी अजिंक्य नाईक यांनी दणदणीत विजय मिळवला अन् संजय नाईक यांचा पराभव केला. एकूण 375 पैकी 335 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. अमोल काळे यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक झाली होती.
निवडणूक निकालानंतर आता अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनी आशिष शेलार यांचे उमेदवार संजय नाईक यांचा 221-114 अशा मतांच्या फरकाने पराभव केला. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्यक्षेत्र हे मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे, नवी मुंबई, डहाणू, बदलापूरपर्यंत आहे. देशाच्या क्रिकेटच्या वर्तुळात मुंबई क्रिकेट असोसिएशन ही एक महत्त्वाची क्रिकेट संघटना आहे. यंदाची मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक रंगतदार होणार अशी चर्चा देखील झाली होती. अशातच सर्वांची धाकधूक वाढवणाऱ्या या लढतीमध्ये अजिंक्य नाईक यांनी विजय मिळवला आहे.