तजिंदरपाल सिंग तूर, दमनीत सिंग यांना जेतेपद
वृत्तसंस्था / सांगरुर (पंजाब)
2025 च्या इंडियन खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात तजिंदरपाल सिंग तूरने तर हातोडाफेक प्रकारात दमनीत सिंगने विजेतेपद पटकाविले.
पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात भारताचा दोनवेळा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा तजिंदरपाल सिंग तूरने राष्ट्रीय विक्रम नोंदवित विजेतेपद पटकाविले. त्याने या क्रीडा प्रकारात 19.51 मी.ची नोंद केली. या क्रीडा प्रकारात सनयामने 19.36 मी.ची नोंद दुसरे स्थान तर प्रभक्रिपाल सिंगने 18.34 मी.ची नोंद करत तिसरे स्थान पटकाविले.
पुरुषांच्या हातोडाफेक प्रकारात दमनीत सिंगने 69.87 मी.ची नोंद करत पहिले स्थान तर गौरवने 67.63 मी.ची नोंद करत दुसरे आणि देवांगने 67.32 मी.ची नोंद करत तिसरे स्थान मिळविले. दमनीत सिंगने 18 वर्षांखालील झालेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत हातोडाफेक प्रकारात रौप्य पदक मिळविले होते. पुरुषांच्या 110 मी. अडथळ्याच्या शर्यतीत मोहम्मद लेझानने 14.08 सेकंदांचा अवधी घेत पहिले स्थान, तरुणदीप सिंगने 14.41 सेकंदांचा अवधी घेत दुसरे तर ग्रेसन जीवाने 14.50 सेकंदांचा अवधी घेत तिसरे स्थान पटकाविले.
महिलांच्या 100 मी. अडथळ्याच्या शर्यतीत प्रांजली पाटीलने 13.66 सेकंदांचा अवधी घेत पहिले, क्रिस्टल वेदाकेलने 14.42 सेकंदांचा अवधी घेत दुसरे तर सोनुकुमारीने 14.61 सेकंदांचा अवधी घेत तिसरे स्थान पटकाविले. विनोदकुमार भानोतने पुरुषांच्या 800 मी. धावण्याच्या शर्यतीत विजेतेपद मिळविताना 1 मिनिट 50.69 सेकंदांचा अवधी घेतला. या क्रीडा प्रकारात सलमान फरुकने दुसरे तर वसंत चौहानने तिसरे स्थान मिळविले.
महिलांच्या 800 मी. धावण्याच्या शर्यतीत प्रिस्कीला डॅनियलने 2 मिनिटे 08.77 सेकंदांचा अवधी घेत विजेतेपद मिळविले असून राधा चौधरीने दुसरे तर वंशिकाने तिसरे स्थान घेतले. पुरुषांच्या 3000 मी. स्टिपलचेस प्रकारात शाहरुख खानने विजेतेपद मिळविताना 8 मिनिटे 46.21 सेकंदांचा अवधी घेतला. पुकेश्वर लालने दुसरे स्थान तर शुभमन श्रीधरने तिसरे स्थान पटकाविले. प्रिती लांबाने महिलांच्या 3000 मी. स्टिपलचेसमध्ये विजेतेपद मिळविताना 10 मिनिटे 0.5.60 सेकंदांचा अवधी घेतला. या क्रीडा प्रकारात याशी सचेनने दुसरे स्थान तर सुशिला प्रजापतने तिसरे स्थान पटकाविले.
महिलांच्या हातोडाफेकमध्ये मनप्रित कौरने 59.79 मी.चे अंतर नोंदवित पहिले स्थान, दिव्या शांडिल्यने दुसरे स्थान आणि ज्योती यादवने तिसरे स्थान मिळविले. महिलांच्या गोळाफेक प्रकारात विधीने 15.38 मी.ची नोंद करत पहिले स्थान, अंजलीने दुसरे तर सृष्टी विजने तिसरे स्थान घेतले. पुरुषांच्या तिहेरी उडीत कार्तिकने 16.11 मी.चे अंतर नोंदवित विजेतेपद पटकाविले असून सेबेस्टीयनने दुसरे तर दिनेशने तिसरे स्थान घेतले आहे. निहारिका वशिष्ठने महिलांच्या तिहेरी उडीत विजेतेपद मिळविताना 13.17 मी.ची नोंद केली. या क्रीडा प्रकारात मलाला अनुषाने दुसरे तर मनाली चौहानने तिसरे स्थान घेतले.