इंदापूरच्या अजय निंबाळकरला रौप्य
वृत्तसंस्था/ जयपूर
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेतील कुस्ती प्रकारात महाराष्ट्राने निराशाजनक कामगिरी प्रदर्शन घडवले. पुरूष गटात अजय निंबाळकरने ग्रीको रोमन 55 किलो गटात रौप्य तर सृष्टी भोसले व समृध्दी घोरपडे यांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे. पुरूषांच्या गटात पदक विजेता ठरलेला अजय हा महाराष्ट्राचा एकमेव कुस्तीगीर ठरला आहे.
भरतपूर (राजस्थान) येथे संपलेल्या कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन 55 किलो गटात अजय निंबाळकरने अंतिम फेरीत मजल मारून चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. आक्रमक खेळ करीत सलामीच्या फेरीत जळगावच्या धनराज सोनवणेवर 8-0 केली. दुस्याफग फेरीत चौधरी देवी लाल विद्यापीठाच्या अभिषेकला 8-0 केले. उपांत्य फेरीत अजमेर विद्यापीठाच्या दिपककुमारला 13-5 हरवून अंतिम फेरीत मजल मारली होती. यानंतर सुवर्णपदकाच्या लढतीत कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या मनीषकुमारने 8-5 गुणांवर अजय निंबाळकरला पराभूत केले. इंदापूरमधील श्री छत्रपती कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शिकणाऱ्या अजयचे वडिल साहेबराव निंबाळकर हे मजुर आहेत. काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तो पुण्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करीत असतो.
सृष्टी भोसले, समृध्दी घोरपडेला कांस्य
महिलांच्या कुस्ती लढतीत शिवाजी विद्यापीठाच्या मुली चमकल्या. फ्री स्टाइल कुस्तीच्या 53 किलो वजन गटात समृद्धी घोरपडेने तर 65 किलो वजन गटांत सृष्टी भोसलेने कांस्य पदकाची कमाई केली. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सृष्टी भोसलेने कांस्य पदकाच्या लढतीत पंजाब विद्यापीठाच्या खेळाडूवर मात केली. सृष्टी शाहू कारखान्याचे मानधनधारक खेळाडू आहे.
दरम्यान, खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदकतक्यात 6 व्या स्थानावर आहे. 6 सुवर्ण, 11 रौप्य व 9 कांस्य अशी 26 पदकांची कमाई पुणे विद्यापीठाने केली आहे. शिवाजी विद्यापीठ 2 सुवर्ण, 2 रौप्य व 7 कांस्यपदके पटकावून 14 व्या स्थानावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 5 तर 55 व्या तर मुंबई विद्यापीठ 4 पदकांसह 56 व्या स्थानावर आहेत.