पाक दौऱ्यासाठी एआयटीए केंद्राचा सल्ला घेणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या फेब्रुवारी महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात डेव्हिस चषक स्पर्धेतील विश्वगट-1 प्लेऑफ लढत होणार आहे. सदर लढत इस्लामाबाद येथे खेळविली जाईल. या लढतीचे यजमानपद पाकला मिळाले आहे. या लढतीसाठी भारतीय डेव्हिस चषक संघाला शासनाची परवानगी अत्यावश्यक आहे. दरम्यान क्रीडा मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार भारतीय टेनिस संघाने पाकचा दौरा करावा, असे सूचीत केल्याचे अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले.
भारत आणि पाक यांच्यातील राजकीय संबंध तणावाचे असल्याने या लढतीला प्रारंभी भारताकडून स्पष्टपणे नकार देण्यात आला होता. त्यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या लवादासमोर नेले. सदर लढत त्रयस्त ठिकाणी खेळवावी अशी विनंती करण्यात आली होती. पण या लवादाने त्रयस्त ठिकाणाची विनंती फेटाळल्याने भारतीय टेनिस संघाला आता क्रीडा मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार या लढतीसाठी पाकचा दौरा करावा, असे सूचित केले आहे. सदर लढत पाक क्रीडा संकुलामध्ये 3 आणि 4 फेब्रुवारीला होणार आहे. यापूर्वी म्हणजे 2019 साली उभय संघातील डेव्हिस लढत बरोबरीत झाली होती. तत्पूर्वी भारत आणि पाक यांच्यातील डेव्हिस लढत 2006 साली मुंबईत झाली होती.