ऐश्वर्य तोमर, महिलांना सांघिक रौप्य
आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धा
वृत्तसंस्था/ कैरो, इजिप्त
भारताचा ऑलिम्पियन नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन्स प्राकारात विश्वविक्रमाशी बरोबरी करीत रौप्यपदक पटकावले. तसेच मनू भाकर, ईशा सिंग, सुरुची इंदर सिंग यांना महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुलच्या सांघिक विभागात रौप्यपदक मिळाले.
तोमरने 466.9 गुण नोंदवत दुसरे स्थान मिळविले तर चीनच्या युकुन लियुने 467.1 गुण घेत सुवर्ण आणि फ्रान्सच्या रोमेन ऑफ्रिरेने 454.8 गुणांसह कांस्यपदक मिळविले. भारताचा आणखी एक नेमबाज नीरज कुमारने 432.6 गुण घेत पाचवे स्थान मिळविले. तत्पूर्वी पात्रता फेरीत 24 वर्षीय तोमरने विश्वविक्रमाशी बरोबरी करीत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली होती. त्याने 597 -40× गुण पात्रता फेरीत मिळविले. नीरजनेही 592 गुण नोंदवत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली होती.
मनू, ईशाकडून निराशा, मात्र सांघिक रौप्य
सोमवारी मनू भाकर व ईशा सिंग यांना महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुलची अंतिम फेरी गाठूनही पदक जिंकता आले नाही. अंतिम फेरीत मनूला 139.5 गुण मिळविता आल्याने तिला सातवे स्थान मिळाले तर अलीकडेच निंगबो येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण मिळविणाऱ्या ईशा सिंगला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. चीनच्या याओ कियानझुनने 243 गुणांसह सुवर्ण, हाँगकाँगच्या हो चिंग शिंगने 241.2 गुणांसह रौप्य व चीनच्या वेइ कियानने 221.4 गुणांसह कांस्य मिळविले. मात्र सांघिक विभागात भारताच्या ईशा (583), मनू भाकर (580), सुरुची इंदर सिंग (577) यांना रौप्यपदक मिळाले.