विमानाचा डीव्हीआर, ब्लॅक बॉक्स हाती
दुर्घटनेमागील कारण उलगडणार : वेगाने तपास सुरू, अनेक शक्यता समोर : 265 जण मृत्युमुखी
विमान दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्याच्या कार्यात भारताला ब्रिटनच्या प्रशासनाचेही साहाय्य होत आहे. या दुर्घटनेत 53 ब्रिटीश नागरिकांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे ब्रिटनने आपले काही तज्ञ तपास कार्यात साहाय्य करण्यासाठी पाठविले आहेत. एका ब्रिटीश नागरिकाचा प्राण या घटनेत वाचला असून त्याचे नाव विश्वास कुमार रमेश असे आहे.
पोर्तुगाल, कॅनडाच्या संपर्कात
या घटनेत पोर्तुगालचे सात नागरिक प्राणांस मुकले होते. तर कॅनडाच्या एका नागरिकानेही जीव गमावला होता. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर हे या दोन्ही देशांच्या संपर्कात आहेत. सर्व मृतांची नावे आता घोषित करण्यात आली असून त्यांच्या नातेवाईकांशी गुरुवारी रात्रीच संपर्क करण्यात आला आहे.
पंतप्रधानांची घटनास्थळी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री उशिरा अहमदाबाद येथे पोहचले. त्यांनी शुक्रवारी सकाळी अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकार आणि गुजरात राज्य सरकारकडून पूर्ण साहाय्य केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच या घटनेची व्यापक आणि सखोल चौकशी केली जाईल, असेही त्यांनी घटनास्थळी बोलताना स्पष्ट केले.
265 मृतदेह रुग्णालयात
या दुर्घटनेत विमानातील 241 तर भूमीवरील 24 नागरिकांचा मृत्यू झाला होता. हे सर्व 265 मृतदेह अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात आणण्यात आले असून तेथे त्यांची डीएनए परीक्षा केली जात आहे. अनेक मृतदेह ओळखू येण्याच्या पलिकडच्या स्थितीत आहेत. काही मृतदेहांची राखरांगोळी झाल्याचे आढळले आहे. प्रवाशांचे हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना देण्यासाठी डीएनए परीक्षण करण्याची आवश्यकता असून ती प्रक्रिया केली जात आहे. या प्रक्रियेला कमीत कमी दोन ते तीन दिवस लागू शकतात, अशी माहिती देण्यात आली.
भूमीवरील 24 जणांचा मृत्यू
विमान वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळल्याने या वसतिगृहातील 24 जणांनाही प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये 5 डॉक्टर्सचाही समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. या मृतदेहांची ओळख पटविण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. वसतिगृहाची इमारत आग लागल्याने हानीग्रस्त झाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा इमारतीला लागलेली आग विझविण्यात यश आले होते.
विजय रुपानी यांची पत्नी मायदेशी दाखलगुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते विजय रुपानी यांचाही या दुर्घटनेत अंत झाला आहे. त्यांचा मृत्यू झाल्याची घोषणा गुरुवारीच करण्यात आली होती. ब्रिटनला गेलेल्या त्यांच्या पत्नी अंजली या शुक्रवारी सकाळीच गुजरातमध्ये परतल्या असून त्या अत्यंत शोकाकूल स्थितीत आहेत. लंडनमध्ये असलेल्या आपल्या कन्येला भेटण्यासाठी विजय रुपानी विदेशात जात होते. तर त्यांची पत्नी काही दिवसांपूर्वीच लंडनमध्ये आपल्या कन्येच्या घरी पोहोचली होती.
रुग्णालयात आक्रोश
अहमदाबाच्या मध्यवर्ती रुग्णालयात सर्व मृतांचे मृतदेह आणण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबियांनी तेथे प्रचंड गर्दी केली आहे. सारे कुटुंबीय अत्यंत शोकमग्न स्थिती असून रुग्णालयात आक्रोश केला जात होता. अनेकांनी एकाचवेळी रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळे गुरुवारी मध्यरात्री काही काळ या परिसरात मोठा गोंधळ उडाला होता. पोलिसांनी आणि रुग्णालय प्रशासनाने त्यांना पूर्ण साहाय्याचे आश्वासन दिल्यानंतर ते शांत झाल्याचे दिसून आले. मृतांच्या कुटुंबियांचे डीएनए नमुने घेण्यात आले असून ते मृतदेहांच्या डीएनएशी पडताळण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. रुग्णालय परिसरात कुटुंबियांना सुविधा पुरविण्यात आल्या आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून सांत्वन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या कुटुंबियांची शुक्रवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. रुपानी आज आपल्यात नाहीत, हे खरेच वाटत नाही. माझी आणि त्यांची घनिष्ट मैत्री होती. आम्ही अनेक दशके राजकारणात एकमेकांना सहकार्य केले. खांद्याला खांदा लावून आम्ही जनता आणि पक्ष यांच्यासाठी कार्य केले. ते माझे निकटचे मित्र होते. त्यांचा असा मृत्यू होणे, हा अकल्पनीय धक्का आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. विजय रुपानी हे कष्टाळू आणि निर्धारी कार्यकर्ते होते. ते तन मन धनाने पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ आणि समर्पित होते. प्रयत्नपूर्वक केलेल्या कामांच्या माध्यमातून त्यांनी पक्षात एकेक पद मिळवत गुजरातच्या मुख्यमंत्री पदापर्यंत प्रगती केली. आज ते नाहीत, हे असहनीय आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय...
दुर्घटनाग्रस्त विमानाचा एक ब्लॅक बॉक्स वसतिगृहाच्या छपरावर आढळून आला आहे. त्यामुळे आता चौकशीला वेग येणार आहे. ब्लॅक बॉक्स किंवा फ्लाईट डाटा रेकॉर्डर आणि डीव्हीआर किंवा डाटा व्हॉइस रेकॉर्डर ही उपकरणे प्रत्येक विमानात असतात. विमानात प्रवास काळात ज्या काही घडामोडी घडतात किंवा जे काही संवाद किंवा ध्वनी होतात ते सर्व या उपकरणांमध्ये ध्वनिमुद्रित केले जातात. 1 हजाराहून अधिक अंश सेल्सिअस तापमान असले तरी ही उपकरणे टिकून राहतात. या उपकरणांमध्ये मुद्रित करण्यात आलेल्या ध्वनींचे नंतर विश्लेषण करण्यात येते. त्यावरून दुर्घटना कशामुळे घडली हे नेमकेपणाने समजू शकते.
सहा मृतदेह कुटुंबियांकडे
शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सहा प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आले होते, अशी माहिती अहमदाबादच्या शासकीय रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. प्रत्येक मृतदेहाचा डीएनए त्याच्या कुटुंबियांची पडताळून मगच देण्यात येत असल्याने ही प्रक्रिया बराच काळ चालणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मतमतांतरांचा गोंधळ
गुरुवारच्या दुर्घटनेनंतर आता तिच्या कारणांसंबंधी मत-मतांतराचे काहूर उठले आहे. घातपातापासून अपघातापर्यंत अनेक अनुमाने व्यक्त केली जात आहेत. विमानाचा लँडिंग गिअर निकामी झाला होता काय? तसे असेल तर तो वेळेवर पुनर्स्थापित का करण्यात आला नाही? विमानाची दोन्ही इंजिने एकाचवेळी निकामी कशी झाली?, इंजिनांमध्ये बिघाड आहे, हे आधी का लक्षात आले नाही? इंजिनांची वेळोवेळी तपासणी होत नाही काय? विमान उ•ाणानंतर त्याला पक्ष्याने धडक दिली काय? इंजिनाला इंधन पुरवठा करणारा स्वीच बंद होता, हा आरोप खरा आहे काय? कोणी हेतुपुरस्सर विमानात बिघाड होईल अशी व्यवस्था केली होती काय? विमानाच्या इंधनात भेसळ होती काय? इंजिनांना इंधन पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये ब्लॉकेज होते काय? असे अनेक प्रश्न विचारण्यात येत आहे. विशेषत: सोशल मीडियावर अनेक जण त्यांची मते आणि अनुमाने व्यक्त करीत आहेत. मात्र, चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही अनधिकृत वृत्तांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन नागरी विमान वाहतूक विभागाने केले आहे. स्वयंघोषित तज्ञांच्या मतप्रदर्शनावर विश्वास ठेवण्याचा मोह टाळावा, अशी सूचना देण्यात आली आहे. तपास येत्या काही आठवड्यांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
नातेवाईकांना भावना अनावर...
विमान दुर्घटनेत मृत झालेल्यांचे मृतदेह घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना त्यांच्या भावना आवरता येणे कठीण झाले आहे. या दुर्घटनेत अनेक उमलती जीवने नष्ट झाली. त्यांच्या कुटुंबियांना काही प्रतिक्रिया देता येणेही कठीण झाले होते. आमच्या सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. आता पुढे करायचे काय, या दु:खातून कसे बाहेर पडायचे, असे प्रश्न पडल्याचे ते बोलून दाखवित आहेत. या दुर्घटनेची पारदर्शीपणे चौकशी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे, अशी मागणी त्यांच्यापैकी अनेकांनी केल्याचे तेथे गेलेल्या पत्रकारांनी नोंदविले आहे. या दुर्घटनेत अनेक माता-पिता आणि बालके पोरकी झाली आहेत. त्यांच्या शोकाला पारावार राहिलेला नाही. तरीही काही जण दु:ख मागे टाकण्याचा निर्धार करत आहेत.
एअर इंडिया सीईओंची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कँपबेल विल्सन यांनी शुक्रवारी सकाळी घेतली आहे. या दुर्घटनेनंतर एअर इंडियाने अशी घटना पुन्हा घडू नये, म्हणून कोणती पावले उचलली आहेत आणि कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, यांची माहिती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. प्रभावित कुटुंबियांना शक्य तितके सर्व साहाय्य आणि आधार दिला जाईल, असे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर या भेटीत स्पष्ट केले आहे.
तज्ञांमध्येही कारणांसंबंधी मतभेद
अनेक वायुवाहतूक तज्ञांनी आणि अभियंत्यांनी या दुर्घटनेवर त्यांची मते दिली आहेत. तथापि, कोणत्याही एका कारणावर त्यांचे मतैक्य होताना दिसलेले नाही. विमानाचे मुख्य चालक सभरवाल हे अनुभवी होते. त्यांना विमानचालनाचा मोठा अनुभव होता. पण त्यांचा साहाय्यक चालक नवा होता, या मुद्द्याकडेही काही तज्ञांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. नियमांच्या अनुसार विमानांची तपासणी केली जातेच. त्याशिवाय त्याला उ•ाणाची अनुमती दिली जात नाही. तरीही अचानक असे व्हावे, ही बाब तज्ञांनाही कोड्यात टाकणारी आहे.
अहमदाबाद विमानतळ पुन्हा कार्यरत
ही दुर्घटना घडल्यानंतर काही तास अहमदाबादचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्यात आला होता. नव्या उ•ाणांना अनुमती दिली जात नव्हती. तथापि, दुर्घटनेनंतर काही तासांच्या आत तो पुन्हा कार्यरत करण्यात आला. गुरुवारी रात्री 11 वाजल्यापासून या तळावरून विमानांची उ•ाणे पुन्हा होऊ लागली. त्यामुळे प्रवाशांना फार काळ तिष्ठत रहावे लागले नाही. पूर्वस्थिती त्वरित स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती विमानतळाच्या प्रशासनाने रात्री उशिरा दिली.