कारमध्ये मागच्या सीटवरही आता एअरबॅग : गडकरी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा प्रवासी गाडय़ांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य असल्याचे स्पष्ट संकेत गुरुवारी दिले. कारच्या मागील प्रवाशांच्या सुरक्षेला सरकारचे प्राधान्य असल्याचे गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले. कारमध्ये आतापर्यंत 2 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या होत्या. मागच्या प्रवाशांसाठी एअरबॅग्ज वापरल्या जात नव्हत्या. मात्र, नजिकच्या काळात परिवहन विभाग कारमधील मागच्या प्रवाशांसाठीही एअरबॅग्ज ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे गडकरी म्हणाले. या सुविधेमुळे लोकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असून सरकार लवकरच निर्णय घेण्याचा प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यापूर्वीही कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा आग्रह धरला होता. तथापि, काही वाहन निर्माते कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याच्या नियमाला सातत्याने विरोध करत आहेत, असेही ते आपल्या निवेदनात म्हणाले. मात्र, सरकारचे हे प्रयत्न केवळ लोकांचे जीव वाचवण्यासाठी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.