हवाई वाहतूक सुरक्षा: अनेकांची परीक्षा
प्रत्येक व्यवसायात सुरक्षा हा विषय वा मुद्दा सर्वोच्च पातळीवर हाताळणे अपेक्षित व आवश्यक असते. कामकाज पद्धतींपासून कायद्यापर्यंत सांगायचे झाल्यास मशीनपासून ती हाताळणाऱ्या माणसांपर्यंत या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक वा तत्सम उच्च पदस्थांची असते. सुरक्षेच्या संदर्भात काही त्रुटीवा कमतरता राहून त्यांची परिणती मोठे अपघात, नुकसान वा जीवितहानी झाल्यास त्यासाठी संबंधित कंपनीच्या उच्च पदस्थांना जबाबदार धरून त्यांच्यावर रितसर कारवाई होते. त्याचवेळी अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटना वा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भविष्यकाळासाठी कायमस्वरुपी व प्रतिबंधात्मक कारवाई आस्थापनेच्या उच्च व्यवस्थापनाने करणे अपेक्षित व आवश्यक असते. उद्योग, व्यवसायातील अपघात नियंत्रणाच्या संदर्भातील याच मार्गदर्शनपर तत्व आणि तत्वज्ञानानुसार टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी विशेषत: ‘एअर इंडिया’ या टाटा उद्योग समूहांतर्गत सुरक्षेवर विशेष कटाक्षासह प्र्रयत्न सुरु केले आहेत.
यामागे अर्थातच असणारे महत्त्वपूर्ण व सर्वांची काळजी आणि जिव्हाळ्याचे कारण म्हणजे गेल्या महिन्यात ‘एअर इंडिया’ च्या अहमदाबाद विमानाला झालेल्या अपघातात 241 प्रवाशांचा झालेला दुर्दैवी मृत्यू. विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उ•ाण घेताच हा भीषण अपघात घडला. हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
या संदर्भात केंद्र सरकारच्या विमान वाहतूक मंत्रालयाने केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार सकृतदर्शनी अहमदाबादच्या विमान अपघाताच्या निमित्ताने विमानतळांवरील विमानो•ाण उपकरणांची हाताळणी, विमानांची विशेष देखभाल व तपासण्या या प्रमुख कारणांचा उल्लेख केला असून त्यासंदर्भात विशेष काळजी घेण्याचे व सुरक्षा निर्देशांबाबत नव्या संदर्भात निर्देश जारी केले आहेत.
याच अनुषंगाने विमान वाहतूक मंत्रालयाने मुंबई, दिल्लीसह सर्वच आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमान वाहतूक करणाऱ्या यंत्रणेसह विमान वाहतूक कंपन्यांना विमान व प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यावर अधिक काळजी घेण्यास सांगितले आहे.
हवाई वाहतूक मंत्रालयाने नव्याने घेतलेल्या काही प्रमुख व धोरणात्मक निर्णयांमध्ये अहमदाबादच्या विमान अपघाताची व त्यामुळे झालेल्या जीवितहानीची प्रामुख्याने नोंद घेतल्याचे स्पष्ट केले असून यासंदर्भात विमानतळ अधिकारी व विमान वाहतूक कंपन्यांचे व्यवस्थापन यांनी घेतलेल्या कारवाईच्या जोडीलाच मंत्रालयाद्वारा विशेष पडताळणी-तपासणी करण्याचे आता ठरविले आहे. यामागे विमान वाहतुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा अशा वाहतूक सुरक्षेला दुहेरी पाठबळ देण्याचा उद्देश यानिमित्ताने स्पष्ट करण्यात आला आहे.
हवाई वाहतूक सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने मंत्रालय स्तरावर व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरा व पहाटे लवकर उ•ाण घेणाऱ्या विमानांची सुरक्षाविषयक पूर्ततेची विशेष पडताळणी घेणे सुरु केले आहे हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. यालाच निवडक प्रसंगी वा आकस्मिक स्वरुपात विशेष सुरक्षा तपासणीची जोड देण्यात आली आहे. यामागे आमचा उद्देश हवाई क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सुरक्षा संदर्भातील जोखीम संपूर्णपणे नष्ट करून संपूर्ण हवाई सुरक्षा हे ध्येय पुरतेपणी साध्य करण्याचा उद्देश स्पष्ट केला आहे. मुख्य म्हणजे हे काम व सुरक्षाविषयक खातरजमा करण्याची जबाबदारी मंत्रालयातील संयुक्त संचालक वा तत्सम स्तरावरील उच्च पदस्थांवर सोपविण्यात आली आहे हे विशेष.
हवाई वाहतूक विषयक सुरक्षिततेची संपूर्ण अंमलबजावणी व खातरजमा करण्यासाठी आता मंत्रालयातील उच्च अधिकाऱ्यांकडून यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या अशा विमानतळावर विमानाच्या उतरण्यापासून त्याची विमानतळावरील हालचाल, तांत्रिक पडताळणी वा सुरक्षात्मक काळजी, विमान थांबल्यानंतर होणारी प्रवासी व त्यांच्या सामानाची वाहतूक, प्रवाशांचे चढणे, उतरणे, बससेवेचा सुरक्षित उपयोग, सामानाची ये-आण, सामानाच्या वजनाच्या मर्यादेचे पालन करणे इ. बाबी विशेष कटाक्षाने पाळल्या जाणार आहेत.
यासंदर्भातील प्राथमिक चौकशीच्या दरम्यान प्रकर्षाने पुढे आलेले मुद्दे म्हणजे आपल्या हवाई वाहतूक क्षेत्रातील सुरक्षेच्या संदर्भात काही त्रुटी वा कमतरता वारंवार होत आहेत. यासंदर्भात संबंधितांचे लक्ष वेधल्यानंतर पण त्याकडे व सुरक्षेसारख्या जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या मुद्याकडे पुरेशा गांभीर्याने पाहिले जात नाही. मुख्य म्हणजे या दुर्लक्षित सुरक्षेचा आढावा पण घेतला जात नाही.
याच दुर्लक्षापोटी विमान आणि प्रवासी या हवाई वाहतूक क्षेत्राशी निगडित दोन्ही प्रमुख मुद्दे कायम दुर्लक्षित राहतात. यामध्ये विमानाची निगा, दुरुस्ती, स्वच्छता यापासून विमानतळाची स्वच्छता, अपुरी प्रकाश व्यवस्था व सामानाची सदोष व निष्काळजीपणे होणारी हाताळणी, सामानाच्या नादुरुस्त ट्रॉलीज असणे या प्राथमिकपणे महत्त्वाच्या बाबी अनेक ठिकाणी नित्याच्या झाल्या आहेत. हाच निष्काळजीपणा दुर्लक्षापासून अपघातांपर्यंत विविध बाबींना कारणीभूत ठरतो.
यापैकी काही मुद्दे व प्रकरणांचा हवाई वाहतूक मंत्रालयातील वरिष्ठ व अनुभवी तंत्रज्ञांकरवी या संदर्भात स्पष्टपणे नमूद केल्यानुसार विमानांची कालबद्ध स्वरुपातील निगा राखणे व त्यांच्या दुरुस्तीच्या संदर्भात वेळेत व पुरेशी काळजी घेणे या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे एकतर दुर्लक्ष केले जाते वा ही महत्त्वाची कामे निष्काळजीपणासह केली जातात. या आणि अशा निष्काळजीपणाची परिणती अपरिहार्यपणे अपघातांमध्ये होते.
सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर हा अपघात व त्यामागची आणि त्याच्याशी संबंधित शक्यता व कारणांची केवळ चौकशी करून त्यावरील उपाययोजनांवरच समाधान न मानता विमान अपघातांच्या मुळाशी जाऊन त्यावर पुरते नियंत्रण मिळविण्याच्या प्रकरणी आता पुढाकार घेतला आहे तो एअर इंडियाचे व्यवस्थापन नियंत्रण करणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष असणाऱ्या एन. चंद्रशेखरन यांनी त्यांना याकामी सहकार्य करीत आहेत, ते एअर इंडियाचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी कँपबेल विलियम. ते विमान वाहतूक सुरक्षा क्षेत्रातील जागतिक स्तरावरील तज्ञ समजले जातात.
टाटा उद्योग समूहाच्या परंपरेनुसार याप्रकरणी आता टाटा समूह अध्यक्षांचा पुढाकार आणि प्रयत्नांमुळे एअर इंडियाच्या हवाई वाहतूक सुरक्षा प्रकरणी तांत्रिक, विमान वाहतूक व कुठल्याही स्वरुपाचा निष्काळजीपणा व दिरंगाई या विविध मुद्द्यांवर सखोल उपाय योजना होणे अपेक्षित आहे आणि हवाई वाहतूक क्षेत्रातील सुरक्षेच्या संदर्भात हीच काळाची गरज आहे.
दत्तात्रय आंबुलकर