For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतातील वायू प्रदूषण धोकादायक वळणावर

06:30 AM Nov 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतातील वायू प्रदूषण धोकादायक वळणावर
Advertisement

शुद्ध हवा, निर्मळ पाणी आणि सकस अन्न या माणसाच्या मूलभूत गरजा असल्या तरी आपल्या देशातल्या बऱ्याच राज्यात या मूलभूत गरजांची पूर्तता करणे, हे मोठे आव्हान ठरलेले आहे. नाका-तोंडाद्वारे जी हवा आम्ही आत घेत असतो, ती प्रदुषित असल्याने, त्यामुळे दरवर्षी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आपल्या देशात वाढत चालली आहे. समाज आणि सरकार हवा प्रदूषणाच्या या गंभीर समस्येचे निराकरण व्हावे यासाठी दुर्लक्ष करीत असल्याने आणि विकासाच्या मृगजळाच्या मागे धावण्यातच आपली शक्ती खर्ची करत असल्याने, पर्यावरणाचा ऱ्हास करत होणारा विकास, हा खरेतर मृत्युपाश ठरू लागलेला आहे, ही गंभीर चिंतेची बाब ठरलेली आहे.

Advertisement

वारेमाप कर्बवायूचे होणारे उत्सर्जन आणि त्याबरोबर धूर, धूळ यांचा होणारा वाढता मारा यामुळे आज हवा प्रदूषणाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक झालेली आहे. जागतिक पातळीवरती बिघडत्या हवेच्या स्तरासंदर्भात हल्लीच जो अहवाल प्रकाशित झालेला आहे, त्यानुसार हवा प्रदूषणामुळे भारतात दिवसाला 464 मुलांचा मृत्यू होत असल्याचे प्रकाशात आलेले आहे. हवेत तरंगणारे अत्यंत सूक्ष्म प्रदूषणकारी घटक नाका-तोंडाद्वारे केल्या जाणाऱ्या श्वसनाद्वारे चक्क मानवी फुफ्फुसांमध्ये प्रवेश करत असल्याने, अशा जहरी वायुकणांमुळे 2024च्या अहवालानुसार 464 बालकांचा दरवर्षी मृत्यू होत असल्याचे उघडकीस आलेले आहे. हे जहरी वायुकण हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग आणि श्वसनाच्या असंख्य आजारांना निमंत्रण देत असतात आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम पाच वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या बालकांच्या आरोग्यावर होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या कर्करोग आणि मधुमेहामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येलाही वायू प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणाने मागे टाकलेले आहे.

आज औद्योगिकरण आणि नागरीकरणामुळे वाढत्या लोकसंख्येच्या असह्याकारक ताणाखाली असणाऱ्या दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बंगळुरुसारख्या महानगरात जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा इथले वायू प्रदूषण धोकादायक वळणावरती येऊन पोहोचलेले आहे. सदर अहवालानुसार वायू प्रदुषणाशी संबंधित राग आणि विकारांपायी 2021 मध्ये जगभरात 8.1 दशलक्ष लोकांना मरण आलेले असून यातील चारपैकी एक मृत्यू भारतात असल्याचे अहवाल सांगत आहे. आपल्या देशाची राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीत वायू प्रदूषणाचा स्तर जहरी असून, पावसाळा कमी झाल्यावर नोव्हेंबरच्या सुमारास ही समस्या अगदी धोकादायक वळणावर पोहोचल्याची वार्ता गेल्या काही वर्षांपासून आपल्या कानावरती पडत असते. त्यामुळे कधी शाळा, महाविद्यालये बंद करणे तर कधी सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना घरांतून काम करण्याचे आदेश देऊन रस्त्यावर येणाऱ्या वाहनांच्या संख्येवरती निर्बंध घालण्यासारखे उपाय करण्याची वेळ नवी दिल्लीवरती आलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या वायू प्रदूषणाच्या निर्देशांकाच्या तीसपटीने नवी दिल्लीतल्या हवा प्रदूषणाची स्थिती खालावली आहे. नवी दिल्लीत दरवर्षी हिवाळ्यात जहरी वायू प्रदूषण उच्चांक गाठत असते आणि त्यामुळे 33 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या देशाच्या राजधानीतली हवा अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचल्याचे स्पष्ट होत असते.

Advertisement

त्यामुळे धूर आणि धुके यांचे मिश्रण झालेल्या विषारी हवेच्या गंभीर दुष्परिणामांना सामोरे जाण्याची वेळ तेथील लोकांवर येत असते. भारतातील हवा प्रदूषणाच्या समस्येमुळे उद्भवणारे आजार आणि त्यामुळे येणारे मृत्यू यांचे प्रमाण लक्षणीय झाल्याने भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी 2019च्या प्रारंभी भारत सरकारने परिस्थितीचे निराकरण व्हावे, यासाठी राष्ट्रीय स्वच्छ वायू निर्देशांक निश्चित केलेला आहे. जगातील प्रदुषित हवेची समस्या असणाऱ्या राष्ट्रांत बांगलादेश प्रथम, पाकिस्तान दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या स्थानी असल्याची माहिती स्वित्झर्लंडमधील हवा गुणवत्ता निरीक्षण संस्थेने जाहीर केलेली आहे. 2023च्या प्रकाशित झालेल्या अहवालानुसार बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वाधिक प्रदुषित महानगर ठरलेले आहे. हवेची सर्वाधिक खराब गुणवत्ता असलेले राजधानी शहर म्हणून दिल्लीचे नाव कायम राहिलेले आहे. भारतात गेल्यावर्षी ‘पीएम’ म्हणजे पर्टिक्gयलेट मायक्रॉन कण 2.5चा स्तर वार्षिक सरासरी दर एक घनमीटरमागे 54.4 मायक्रो ग्रॅम इतका झालेला होता. जगभरातल्या अधिकाधिक प्रदुषित शहरांत आपल्या देशातील 42 शहरे, 50 शहरांच्या यादीत आलेली आहेत. दिल्ली, गुवाहाटी, ग्रेटर नोयडा, मुझफ्फरनगर, गुरुग्राम, आरा, दादरी, पाटणा, फरिदाबाद, नोयडा, मेरठ, गाझियाबाद आणि रोहतक ही शहरे प्रदुषणकारी हवेमुळे आज विशेष चर्चेत आलेली आहेत.

हिवाळी मोसमात निसर्गत: दाट धुके पडलेले असते. थंडीचे प्रमाणही लक्षणीय असते आणि अशावेळी परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांनी अन्न-धान्याच्या पैदासीनंतर पिकांचे उर्वरित तृणपाती पेटवल्यावर, त्यातून तयार होणारा धूर ढगात मिसळून, ढगाच्या वर जाऊन राहतो आणि त्यामुळे हवेतील प्रदुषित सूक्ष्म कणांची संख्या वृद्धिंगत करतो. पिकांची काडे खरीप हंगामानंतर पेटवू नयेत, असे कायद्याने आणि लोकजागृतीने सांगितलेले असतानाही आजही पिकांचे उर्वरित अंश जाळण्याचे प्रमाण नियंत्रणाखाली आलेले नाही. अशा पिकाच्या उर्वरित काडीपासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पांना निर्मिती करण्यास आधार देण्याची गरज आहे. या टाकाऊ कचऱ्यापासून जैविक खत, त्याचप्रमाणे हा कचरा शेतजमिनी नांगरून, जमिनीखाली गाडला तर शेतजमिनीची उत्पादन क्षमता वाढण्याची शक्यता असते. वाहतूक, उद्योग, शेती, ऊर्जा, कचरा प्रक्रिया, बायोमास जाळणे, निवासी, बांधकाम आणि विघटन कचरा हे वायू प्रदूषणाचे मुख्य स्रोत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्बवायुचे उत्सर्जन होत असते.

भारतातील कर्बवायुच्या उत्सर्जनात ऊर्जा प्रकल्पांचे योगदान लक्षणीय असून, औष्णिक ऊर्जा केंद्रांना मोठ्या प्रमाणात राजाश्रय लाभलेला आहे. उर्जेची वाढती गरज भागविण्यासाठी जोपर्यंत हरित आणि नूतनीकरणक्षम संसाधनांसह पर्यायी ऊर्जा स्रोतांचा अवलंब करण्याची नितांत गरज उद्भवलेली आहे. जीवाश्म इंधनाचा वापर नियंत्रित करण्याची आवश्यकता महत्त्वाची ठरलेली आहे. जहरी वायू प्रदूषणाला रोखण्यासाठी आज आम्ही प्रामाणिकरित्या प्रयत्न केले नाहीत तर वर्तमान आणि भविष्यकाळात मृत्यूचे तांडव सुरू होऊन आमच्या एकंदर अस्तित्वासाठी प्रतिकूल परिस्थिती उद्भवणार आहे.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :

.