प्राणायाममुळे विषयांची ओढ कमी होते
अध्याय चौथा
बाप्पा म्हणाले, वेदांनी सांगितल्याप्रमाणे प्राणशक्तीच्या आश्रयाने हे जीवन अखंड सुरु असते. ह्या प्राणाचे त्यांच्या त्यांच्या कार्यानुसार प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे पाच प्रकार पडतात. आपले शरीर पेशींचे बनलेले असते. शरीरातल्या प्रत्येक पेशीवर प्राणाचे पाचही प्रकार कार्य करत असतात. ह्या सर्व प्राणशक्ती प्रत्येक घटकात असल्या तरी त्यांचे कार्य विशेषकरून जेथे चालते त्यावरून त्यांची शरीरातील स्थाने आपल्या प्रत्ययास येत असतात. आपल्या शरीरात आकलन, मलविसर्जन, अन्नपचन, रक्ताभिसरण आणि मानसिक व बौद्धिक सुधारणा ही कार्ये चालूच असतात. प्राणायामने त्यांना स्वत:च्या अधिकारात आणले जाते. ह्या क्रियांवर प्राणायामच्या माध्यमातून ताबा मिळवला तर एकाग्रता साधणे सोपे जाते. साधकाची शारीरिक क्षमता वाढते. माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्न, पाणी आणि हवेची जरुरी असते. यापैकी अन्न व पाणी यांची निवड करताना मनुष्य चोखंदळ असतो पण हवेबाबत फारसा विचार न करता ते कार्य निसर्गावर सोडतो. प्रत्यक्षात प्राणाची सुधारणा करण्याची व त्याची कार्यक्षमता वाढवण्याची धडपड कोणी करत नाहीत. वर सांगितल्यापैकी प्राणवायू हृदयात राहतो व अपानवायू गुदस्थानात राहतो हे दोन स्वाधीन झाले की, बाकीचे आपोआप स्वाधीन होतात.
जाणकार मुनींच्यामते या दोन वायूंचा रोध करणे यालाच प्राणायाम म्हणतात. ह्या अर्थाचा प्राणायामं तु संरोधं प्राणापानसमुद्भवम् । वदन्ति मुनयस्तं च त्रिधाभूतं विपश्चितऽ ।।27 ।। श्लोक आपण पहात आहोत. साधक प्राणायामचा अभ्यास करू लागला की, चित्तातील सत्वगुणावर रज आणि तम गुणाचे असलेले पांघरूण काढले जात असल्याची अनुभूती येते. माणसाच्या चित्तात प्रामुख्याने सत्वगुणाचा प्रभाव असतो. परंतु जोपर्यंत चित्तात विषय उपभोगायची इच्छा होत असते म्हणजे भोगार्थता नांदत असते तोपर्यंत, चित्तातील सत्व गुणावर रज आणि तमोगुण पांघरूण घालत असतात. त्यामुळे त्यांचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे रज, तमोगुणानुसार होणाऱ्या वासना जोर करत असतात. ज्याप्रमाणे सोने भट्टीत घालून तापवले असता त्यातील हिणकस भाग जळून जातो व शुद्ध सोने तेजाने अधिक उजळून निघते त्याप्रमाणे प्राण निग्रहाने इंद्रियांचे सर्व दोष जळून जातात. रज, तम गुणांमुळे होणाऱ्या वासना निर्बल होत जातात. ह्याप्रमाणे वासनांचे आवरण विरळ झाल्याने चित्तातील सत्वगुणाच्या ठिकाणी असलेला प्रकाशकता हा गुण अधिकाधिक स्पष्ट होऊ लागतो. त्यामुळे आपोआपच इंद्रियांची विषयांची ओढ कमी होते. श्वास घेणे आणि सोडणे यांची संख्या सम राहिली तर प्रकृती चांगली राहून मन साम्यावस्थेत राहते. अशाप्रकारे मन स्थिर होणे मोक्षप्राप्ती होण्यासाठी आवश्यक आहे. प्राणायामचे तीन प्रकार आहेत असे ह्याबाबतीत तज्ञ असलेले मुनी सांगतात.
प्रमाणं भेदतो विद्धि लघुमध्यममुत्तमम् ।
दशर्भिद्व्यधिकैर्वर्णैऽ प्राणायामो लघुऽ स्मृतऽ ।। 28 ।।
अर्थ- लघु, मध्यम व उत्तम असे तीन प्रकार आहेत. बारा वर्णांनी होणारा प्राणायाम ‘लघु’ होय. चतुर्विंशत्यक्षरो यो मध्यमऽ स उदाहृतऽ ।
षत्रिंशल्लघुवर्णो य उत्तमऽ सोऽ भिधीयते ।। 29 ।।अर्थ- चोवीस अक्षरांचा प्राणायामला ‘मध्यम’ तर छत्तीस ऱ्हस्व अक्षरांचा प्राणायाम ‘उत्तम’ असतो. प्राणायामचे तीन प्रकार आहेत. बारा अक्षरे उच्चारेपर्यंत जो वेळ लागतो तेव्हढ्या वेळात सिद्ध होणाऱ्या प्राणायामला लघु, तर चोवीस वर्ण उच्चारेपर्यंत जो वेळ लागतो तेव्हढ्या वेळात सिद्ध होणाऱ्या प्राणायामला मध्यम आणि छत्तीस वर्ण उच्चारेपर्यंत जो वेळ लागतो तेव्हढ्या वेळात सिद्ध होणाऱ्या प्राणायामला उत्तम म्हणतात.
क्रमश: