भाजपच्या सत्ता काळात विमान प्रवासी संख्येत 13 कोटींची वाढ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर-मुंबई विमानसेवेचा थाटात प्रारंभ
सोलापूर : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते सन २०१४ पर्यंत भारतात विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या दहा कोटी इतकी होती. सन २०१४ पासून देशात भाजपची सत्ता आल्यानंतर गत १० वर्षात ही संख्या १३ कोटी वरून २३ कोटी इतकी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसांना विमानाचे स्वप्न दाखविण्याच्या धोरणामुळेच हे शक्य झाले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सोलापुरात केले. विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल. उद्योजक हवाई सेवेची उपलब्धता पाहून गुंतवणुकीचा निर्णय करतात. जगाच्या बाजाराशी जोडले जात असताना विमानसेवा असणे महत्वाचे आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बार्शी, वैराग, पांगरी, कुर्डवाडी, मोहोळ या पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
यावेळी सोलापूर-मुंबई व्यासपीठावर केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, माजी आमदार नरसिंग मॅगजी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्ला परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्टार एअरचे संजय घोडावत, एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या सहायक व्यवस्थापक अंजली कुमारी आदी उपस्थित होते.