जुलैपर्यंत वायुदलाला मिळणार एलसीए मार्क-1ए
एचएएलला आणखी ऑर्डर मिळण्याची अपेक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुदलाला देशाचे पहिले एलसीए मार्क-1ए लढाऊ विमान जुलैपर्यंत प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून हे विमान यापूर्वी फेब्रुवारी-मार्चमध्ये वायुदलाला सोपविले जाण्याची अपेक्षा होती, परंतु तांत्रिक कारणांमुळे यात विलंब झाला आहे.
भारतीय वायुदल आणि एचएएलने अलिकडेच एलसीए लढाऊ विमान प्रकल्पाची समीक्षा केली आहे. आता हे विमान जुलैपर्यंत वायुदलाला सोपविले जाण्याची अपेक्षा असल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पंतप्रधानांना केले जाणार आमंत्रित
एचएएलने मागील महिन्यात या लढाऊ विमानाचे पहिले उ•ाण करविले होते. वायुदलाला सोपविले जाण्यापूर्वी पुढील काही आठवड्यांमध्ये याचे अनेक अन्य एकीकरण परीक्षणं पूर्ण करण्यात येणार आहेत. स्वदेशी लढाऊ विमानाला वायुदलाच्या ताफ्यात सामील करणे सैन्य क्षेत्रात आत्मनिर्भरता साकार करण्याच्या दिशेने मोठे पाऊल ठरणार आहे. तसेच हे लढाऊ विमान वायुदलाला सोपविण्याच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांना देखील आमंत्रित केले जाऊ शकते.
एचएएलला ऑर्डर
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर एलसीए मार्क-1ए प्रकल्पाला चालना मिळाली होती. 83 लढाऊ विमानांसाठी 48 हजार कोटी रुपयांची ऑर्डर यापूर्वीच एचएएलला देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 97 विमानांसाठी 65 हजार कोटी रुपयांची आणखी एक ऑर्डर दिली जाण्याची अपेक्षा आहे. संरक्षण मंत्रालयाने 97 भारतात निर्मित एलसीओ मार्क 1 ए लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी एचएएलला यापूर्वीच निविदा जारी केली आहे. ही निविदा भारत सरकारची स्वदेशी सैन्य हार्डवेअरकरता दिलेली आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर आहे. एलसीए मार्क-1ए लढाऊ विमानांद्वारे भारतीय वायुदलातील मिग-21, मिग-23 आणि मिग-27 विमानांना बदलले जाणार आहे.