अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्याची एआयडीएसओची मागणी
बेळगाव : राज्यातील सर्व सरकारी महाविद्यालये अतिथी शिक्षकांवर अवलंबून आहेत. महिना उलटला तरी अतिथी शिक्षक नसल्याने अभ्यासक्रमावर याचा परिणाम होत आहे. तसेच मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. पुढील महिन्यात महाविद्यालयांकडून अंतर्गत परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र अतिथी शिक्षक नसल्याने अभ्यासक्रम पूर्ण झालेला नसून विद्यार्थ्यांना परीक्षा देणे मुश्कील होणार आहे. यासाठी लवकरात लवकर अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी ऑल इंडिया डेमोक्रॅटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशन (एआयडीएसओ) च्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. युजीसीच्या नवीन निर्देशानुसार तसेच न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणामुळे अतिथी शिक्षकांच्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार शैक्षणिक बाबींमध्ये केंद्र सरकारच्या निर्णयांचे पालन करण्यास बांधील नसल्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी स्पष्ट भूमिका घ्यावी. तसेच शैक्षणिक उपक्रम सुरळीत पार पडण्यासाठी व पदवी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणीही करण्यात आली.